चीनने भारतीय सीमेजवळ तैनात केली लढाऊ विमाने, सॅटेलाईट फोटोमध्ये धक्कादायक खुलासा

| Updated on: May 30, 2024 | 10:08 PM

भारताच्या सीमेपासून फक्त 150 किलोमीटर अंतरावर चीनने आपली अत्याधुनिक J-20 स्टेल्थ लढाऊ विमाने तैनात केली आहेत. गुप्तचर माहिती संकलित करणाऱ्या ऑलसोर्स ॲनालिसिसने हा खुलासा केला आहे.

चीनने भारतीय सीमेजवळ तैनात केली लढाऊ विमाने, सॅटेलाईट फोटोमध्ये धक्कादायक खुलासा
Follow us on

भारतीय सीमेपासून फक्त 150 किलोमीटरच्या अंतरावर सिक्कीम जवळ चीनने त्यांचे सर्वात अत्याधुनिक J-20 स्टेल्थ लढाऊ विमाने तैनात केले आहेत. सॅटेलाइट फोटोंमधून ही गोष्ट समोर आली आहे. वॉशिंग्टनच्या थिंक टँक सेंटर फॉर इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजने आपल्या अहवालात खुलासा केला होता की चीनने अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या विवादित भागात 2018 ते 2022 दरम्यान 624 गावे वसवली आहेत.

ऑलसोर्स ॲनालिसिस जे उपग्रहांच्या फोटोमार्फत गुप्तचर माहिती गोळा करतात त्यांनी सांगितले की, चीनी वायुसेनेने तिबेटचे दुसरे सर्वात मोठे शहर शिगात्से येथे प्रगत J-20 स्टेल्थ लढाऊ विमाने तैनात केली आहेत. शिगात्से येथील या विमानतळाचा चीन लष्करी आणि नागरी विमानतळ म्हणून वापर करतो. हे विमानतळ १२,४०८ फूट उंचीवर आहे, जे जगातील सर्वात उंच विमानतळांपैकी एक आहे. KJ-500 एअरबोर्न अर्ली वॉर्निंग आणि कंट्रोल एअरक्राफ्ट देखील उपग्रह फोटोंमध्ये दिसत आहे.

विमानांची तैनाती आश्चर्यकारक

भारतीय हवाई दलाला या J-20 लढाऊ विमानांच्या तैनातीबाबतही माहिती असल्याचं समोर आलंय. 27 मे 2024 रोजी प्राप्त झालेल्या अनेक उपग्रह फोटोंचे विश्लेषण केले गेले आहे. J-20 स्टेल्थ लढाऊ विमान हे चीनचे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक ऑपरेशनल लढाऊ विमान आहे. हे विमान चीनच्या पूर्वेकडील प्रांतांमध्ये तैनात करण्यात आले आहे. शिगात्से, तिबेटमध्ये या विमानांची तैनाती आश्चर्यकारक आहे. ऑलसोर्स ॲनालिसिसच्या विश्लेषणानुसार, ही विमाने 27 मे 2024 रोजीच हवाई तळावर पोहोचली होती. त्याआधी  वाय-20 वाहतूक विमानाने ग्राउंड क्रू आणि सपोर्ट उपकरणांच्या संभाव्य तैनातीसाठी लँडिंग केले होते.

चीनने ही J-20 लढाऊ विमाने शिगात्सेमध्ये कायमची तैनात केली आहेत की तात्पुरती आहेत हे स्पष्ट झालेले नाही. पण भारतीय सीमेजवळ त्यांची तैनाती धक्कादायक आहे.

सहा J-20 लढाऊ विमानांव्यतिरिक्त, आठ J-10 लढाऊ विमाने आणि एक KJ-500 एअरबोर्न अर्ली वॉर्निंग आणि कंट्रोल एअरक्राफ्ट देखील शिगात्सेमध्ये तैनात केलेले दिसत आहे. भारत आणि चीन यांच्यात तणाव आहे. आता भारताने देखील LAC वर ३६ राफेल लढाऊ विमानांचा ताफाही तैनात केला आहे.गुरुवारी हवाई दलाने अधिकृतपणे माहिती दिली की, त्यापैकी 8 राफेल लढाऊ विमाने अमेरिकन हवाई दलासोबत हवाई लढाऊ सरावासाठी अलास्का येथे गेली आहेत. शिगात्से एअरबेस पश्चिम बंगालमधील हाशिमारा पासून 290 किलोमीटरहून कमी अंतरावर आहे, जिथे भारताने 16 राफेलचे दुसरे स्क्वॉड्रन तैनात केले आहे. गंगटोकपासून त्याचे अंतर 233 किमी आहे.

चीनने आपल्या ताब्यातील तिबेटमध्ये J-20 लढाऊ विमाने तैनात केली होती. चीनच्या होटान प्रांतातील शिनजियांगमध्ये J-20 विमाने दिसले आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला, लेह एअरबेसपासून 382 किमी दूर असलेल्या होटन एअरबेसवर चीनने नवीन रनवे तयार केल्याचे सॅटेलाइट फोटोमधून उघड झाले होते. होटन एअरबेसवर बांधण्यात आलेल्या नवीन धावपट्टीची लांबी 3700 मीटर आहे.

चीनने तेथे दोन धावपट्ट्या बांधल्या आहेत, त्यापैकी एक लष्करी कामांसाठी वापरला जात आहे आणि जुन्या धावपट्टीचा वापर नागरी सेवांसाठी केला जात आहे. चीनने बांधलेल्या नव्या धावपट्टीची लांबी जास्त असल्याने त्यावर छोटी लढाऊ विमाने तसेच मोठी लष्करी विमाने उतरवता येतील. चीनने आधीच J-20 लढाऊ विमाने, शेनयांग J-8 इंटरसेप्टर विमान, शानक्सी Y-8G आणि KJ-500 लवकर चेतावणी देणारी AWACS विमाने आणि हवाई संरक्षण युनिट्स होटन एअरबेसवर तैनात केली आहेत.