शिमला : केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी आज हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर कुल्लू विमानतळावर दाखल झाले. कुल्लू विमानतळावरुन नितीन गडकरी यांचा ताफा पुढे निघाला तेव्हा एक विचित्र घटना बघायला मिळाली. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे सुरक्षा अधिकारी आणि कुल्लूचे एसपी यांच्यात जोरदार झडप झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याने कुल्लूच्या एसपींना लाथा-बुक्यांनी मारहाण केली. संबंधित घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Clash Between SP and CM Jairam Thakur security incharge during Minister Nitin Gadkari Himachal Pradesh tour).
संबंधित घटनेचा जो व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा अधिकारी आणि कुल्लूचे एसपी यांच्यात हाणामारी होत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा अधिकारी एसपींना लाथा-बुक्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी पोलीस आणि इतर अधिकारी मारहाण रोखण्याचा प्रयत्न करतात. संबंधित प्रकार घडत असताना काही नागरिक तिथे हा सर्व प्रकार बघत असतात. यावेळी काही नागरिक एसपी साहेबांना मारहाण का करत आहात? असा सवाल करत जोरजोराने ओरडायला लागतात. त्यानंतर एक पांढऱ्या रंगाची कार पुढे जाते. या कारच्या चारही बाजूने पोलिसांची सुरक्षा असते. हा संबंध प्रकार अनेकजण मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करतात.
नितीन गडकरी कुल्लू विमानतळावर दुपारी दाखल झाले. यावेळी विमानतळाबाहेर फोरलेन प्रकल्पाने बाधित असलेले काही शेतकरी तिथे दाखल झाले होते. त्यांचे विमानतळाबाहेर निदर्शने सुरु होती. यावरुन मुख्यमंत्र्याचे सेक्युरिटी इंचार्ज अॅडिशनल एसपी बृजेश सूद यांना राग आला. याच मुद्द्यावरुन त्यांनी कुल्लूचे एसपी गौरव सिंह यांच्याशी वाद घातला. या वादाचे रुपांतर थेट हाणामारीत बघायला मिळालं (Clash Between SP and CM Jairam Thakur security incharge during Minister Nitin Gadkari Himachal Pradesh tour).
विशेष म्हणजे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासमोर संबंधित प्रकार घडला. एसपी गौरव सिंह यांनी एएसपी बृजेश सूद यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर सूद यांनी सिंह यांच्यावर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला.
केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये अशाप्रकारे झडप होणे, निंदणीय असल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून दिली जात आहे. या प्रकरणाचे आता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक शिमला येथून कुल्लूच्या दिशेला रवाना झाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर कुल्लू विमानतळावर दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान कुल्लूचे एसपी आणि मुख्यमंत्र्याचे सुरक्षा अधिकारी यांच्यात झडप झाली #nitingadkari #HimachalPradesh pic.twitter.com/JkUCQ1eW5f
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 23, 2021