रायपूर : छत्तीसगडमध्ये एक परंपरा आहे. यानुसार लोक जंजगिरी गावात जातात. त्याठिकाणी गावातील एक व्यक्ती तुम्हाला चाबकाचे फटके मारतो. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीसुद्धा हे फटके आनंदाने स्वतःला मारून घेतले.
जंजगिरी गावात शुक्रवारी सकाळीच मुख्यमंत्री बघेल पोहचले. गोवर्धन पूजा त्यांच्या हस्ते पार पडली. तसेच गौरा-गौरी पूजाही बघेल यांनी केली. त्यानंतर त्यांनी आपला हात समोर केला. स्थानिक वीरेंद्र ठाकूर यांच्याकडून बघेल यांनी चाबकाचे फटके मारून घेतले. फटके खात असताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती नव्हती. ते हसत-हसत फटके खात होते.
गोवर्धन पूजेच्या दिवशी चाबकाचे फटके मारून घेतल्यास जीवनात सुख-समृद्धी येत असल्याची लोकमान्यता आहे. यासाठी आजूबाजूचे लोक गोवर्धन पूजेच्या दिवशी जंजगिरी गावात येतात. ठाकूर यांच्या हस्ते कुशापासून बनविलेल्या चाबकाचे फटके मारून घेतात. आता ही परंपरा त्यांचा मुलगा वीरेंद्र ठाकूर हे चालवितात. बघेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा ठाटबाट सोडून सामान्य नागरिकांसारखी याठिकाणी हजेरी लावली. कार्यक्रमाला उपस्थित राहून जीवनात सुख-समृद्धी यावी, यासाठी हे फटके खाल्ले.
गोवंश ही आपली परंपरा आहे. ही परंपरा आपण जपली पाहिजे. गोवंश समुद्ध झाल्यास आपली प्रगती होईल. त्यामुळंच ग्रामीण भागात गोवर्धन पूजा लोकप्रीय होत आहे. लोक वर्षभर या परंपरेची वाट पाहतात. ही पूजा गोवंशाबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बघेल यांनी दिली.
सकाळी सकाळी लोकांमध्ये सहभागी झाल्याने खूप बरे वाटले. गोवर्धन पूजा लोकांच्या उत्सवाची परंपरा आहे. आमच्या पूर्वजांनी सुंदर परंपरा निर्माण केल्या आहेत. या परंपरांच्या माध्यमातून जीवनांत रंग भरले जातात. जनतेमध्ये पोहचून मला खूप आनंद झाला आहे, असे मुख्यमंत्री बघेल म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, आपला प्रदेश सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. उत्सवांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. कितीतरी सुंदर परंपरा छत्तीसगडमध्ये आहेत. आपली संस्कृती शेतीला चालना देणारी आहे. या माध्यमातून आपण जमिनीशी जोडले जातो. हा प्रदेश नेहमी आघाडीवर राहावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
इतर संबंधित बातम्या