अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्येत उतरले आहेत. त्यानंतर हे दोन्ही नेते हॉटेल पंचशीलकडे जायला निघाले आहेत. प्रचंड मोठी रॅली करत हे दोन्ही नेते पंचशील हॉटेलकडे निघाले. यावेळी शिवसेना आणि भाजपने बाईक रॅलीच्या माध्यमातून मोठं शक्तीप्रदर्शन केलं. हजारो शिवसैनिक या रॅलीत सहभागी झाले होते. काही शिवसैनिक पायी चालत होते तर काही बाईकवरून येत होते. त्यानंतर हा ताफा पंचशील हॉटेलवरून अयोध्येत राममंदिर परिसरात आला तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
रामलल्लाचं दर्शन करण्यासाठी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लखनऊमध्ये दाखल झाले होते. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही लखनऊमध्ये आले. त्यानंतर दोन्ही नेते हेलिकॉप्टरने अयोध्येला आले. अयोध्येतून त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. मोठी बाईक रॅली काढण्यात आली होती. या रोड शोला प्रचंड गर्दी झाली होती. स्थानिक लोकही या दोन्ही नेत्यांना पाहण्यासाठी एकवटले होते. कपाळावर टिळा आणि गळ्यात भगवा शेला घालून दोन्ही नेते जीपवरून हात उंचावून दाखवत होते. शिवसैनिकांच्या हातात भगवे झेंडे होते. जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवमय झालं होतं. तसेच अयोध्येत नाक्या नाक्यावर भगवे झेंडे लावण्यात आले होते. पोस्टर्स आणि बॅनरबाजी करण्यात आली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकांमध्ये अपार उत्साह आहे. आनंद आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. लखनऊपासून अयोध्येपर्यंत स्वागत केलं जातंय. संपूर्ण अयोध्या भगवी झाली आहे. राममय झालं आहे. आम्ही आभार मानतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तर, हा आत्मिक आनंद असतो तो घेण्यासाठी आलो. आमच्या दौऱ्याला प्रतिसाद मोठा आहे. हिंदुत्ववादी सरकार आल्याचा आनंद आहे. आमचा तो संघर्षाचा काळ होता. मोदींनी आमचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
रावण राज्य गेलं आणि रामावर भक्ती असणाऱ्यांचं सरकार आलं आहे, असं फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील दुष्काळावर लक्ष ठेवून आहे. पंचनामे सुरू आहेत. विरोधकांचं कामच टीका करण्याचं आहे, असं फडणवीस म्हणाले. तर आदित्य ठाकरे यांना खूप शिकायचं आहे. त्यांना रिअॅक्ट करण्याएवढे ते मोठे झालं नाहीत. ते तेवढे प्रगल्भ बोलत नाहीत, असंही ते म्हणाले.
दरम्यान, महारॅलीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामलल्लाची महाआरती करण्यात आली. महाआरतीवेळी शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार आणि मंत्री हजर होते. शंखनादात राम मंदिरात आरती करण्यात आली. मंदिराबाहेर हजारो शिवसैनिकांची गर्दी जमली होती.