मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा, मात्र तयारी भाजपची

| Updated on: Apr 07, 2023 | 4:21 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 एप्रिल रोजी खासदार, आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहेत. ते उद्या लखनऊमध्ये उतरतील. शिंदे यांच्या सोबत सुमारे 3 हजार शिवसैनिक अयोध्येत दाखल होणार आहेत. त्याची तयारी भाजपकडूनही केली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा, मात्र तयारी भाजपची
Follow us on

गिरीश गायकवाड, लखनऊ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची तयारी दोन राज्यात सुरु झाली आहे. महाराष्ट्राप्रमाणे उत्तर प्रदेशातही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची तयारी सुरु आहे. शिंदे यांचा अयोध्या दौरा यशस्वी करण्यासाठी उत्तर प्रदेशातील नेत्यांप्रमाणे भाजपचे महाराष्ट्रातील नेतेही मैदानात उतरले आहे. भाजपने दोन जणांवर ही जबाबदारी सोपवली आहे. भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्यावर विशेष जबाबदारी दिली आहे. तसेच आशिष शेलार यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी उत्तर प्रदेशातील भाजप नेतेही असणार आहेत. अयोध्येत मोठे शक्ती प्रदर्शन करुन शिंदेंना बळ देण्याचे काम भाजप करणार आहे.

काय सुरु आहे तयारी

हे सुद्धा वाचा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत राम मंदिरात जाऊन महाआरती करणार आहेत. नंतर शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी झाली आहे. शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आधीपासूनच अयोध्येत दाखल झाले असून ते या दौऱ्याची वातावरण निर्मिती करत आहेत. याचाच एक भाग म्हणून पहिल्यांदाच अयोध्येत एकनाथ शिंदे यांचे पोस्टर लागले आहेत.

चलो अयोध्या… प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान… असा मजकूर या पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे. ठिकठिकाणी शिवसेनेचे झेंडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण वातावरण भगवामय झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार, खासदार पदाधिकारी, हजारोच्या संख्येने अयोध्येत दाखल होत आहेत. त्याच्या नियोजनाचे काम उत्तर प्रदेशातील भाजप पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

वातावरण भगवे


अयोध्येतील हनुमान गढी, राम मंदिर परिसरात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांचे स्वागत करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टर्स आणि बॅनर्सवर भगवान श्री राम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्रे आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धरमवीर आनंद दिघे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची छायाचित्रे आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा फोटो जोडण्यात आला आहे. पोस्टरमध्ये शिवसेनेचा झेंडा आणि धनुष्यबाणाचे चिन्हही नमूद करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे उद्या 8 एप्रिल रोजी खासदार, आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहेत. ते उद्या लखनऊमध्ये उतरतील. शिंदे यांच्या सोबत सुमारे 3 हजार शिवसैनिक अयोध्येत दाखल होणार आहेत.