अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि शिवसेनेच्या मंत्री, आमदार आणि खासदारांनी आज राम मंदिरात प्रभू रामाची महाआरती केली. त्यानंतर या नेत्यांनी राम मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली. नंतर हनुमान गढी येथे जाऊन हनुमानाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. हा संवाद साधत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला.
भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शाल, श्रीफळ आणि भव्य गदा देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते. यावेळी छोटेखानी भाषणही झालं. देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधून ते निघून गेले. फडणवीस यांना पक्षाच्या कामानिमित्त दिल्लीला जायचे होते. त्यामुळे ते तातडीने निघाले. त्यानंतर शिंदे यांनी जनतेशी संवाद साधला.
अयोध्येचं वातावरण केसरीयामय झालं आहे. भगवामय झालं आहे. राममय झालं आहे. तुम्ही आमचं जोरदार आणि जल्लोषात स्वागत केलं. तुम्हा सर्वांचे आभार मानतो. यावेळी रामाचं धनुष्य घेऊन आम्ही आलो आहोत. प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. सर्वांना वाटत होतं राम मंदिर कसं होणार? आधी मंदिर, नंतर सरकार असं म्हणत आम्हाला हिणवलं जायचं. मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे असं म्हणतही काही लोक आम्हाला हिणवायचे. पण मोदींनी पाऊल उचललं आणि मंदिर बनलं. मंदिर बनत आहे आणि तारीखही ठरली आहे. जे लोक हिणवत होते त्यांना मोदींनी घरचा रस्ता दाखवला आहे, असं हल्ला एकनाथ शिंदे यांनी चढवला.
राम मंदिर बांधण्यात महाराष्ट्राने खारीच वाटा उचलला आहे. खारीचा वाटा माहीत आहे ना. जसं राम सेतू बांधण्यात राम भक्तांनी उचलला होता. तसाच. काही लोक आमच्या सरकारला नावे ठेवतात. आमचं रावण राज आहे असं म्हणतात. नवनीत राणा यांनी हनुमान पठन केलं. त्यामुळे नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना देशद्रोहाचा आरोप ठेवून तुरुंगा टाकलं गेलं. राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकणारे कोण आहेत? ते राम आहेत की रावण आहेत? तुम्हीच आता ठरवा, असा हल्ला चढवतानाच साधूंची हत्या झाली तेव्हाही ते गप्प बसले होते. आमच्या काळात साधू सुरक्षित राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उत्तर प्रदेश’चा नाराही दिला.