नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : भाजपला 2024च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी मोट बांधली आहे. एकूण 26 पक्ष एकत्र आले आहेत. विरोधकांनी आपल्या नव्या आघाडीचं नाव INDIA असं ठेवलं आहे. तर भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं नाव एनडीएच राहणार आहे. त्यामुळे INDIA विरुद्ध NDA असा महामुकाबला 2024च्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. विरोधकांनी आपल्या आघाडीचं नाव INDIA ठेवल्यानंतर त्याचा सर्वात पहिला धसका भाजपच्या एका मुख्यमंत्र्यांनीच घेतला आहे. या मुख्यमंत्र्याने आपल्या ट्विटर बायोमधील INDIA हा शब्दच वगळला आहे. त्यामुळे या मुख्यमंत्र्यावर टीकेची झोड उठत आहे.
विरोधकांनी आपल्या आघाडीचं नाव INDIA ठेवल्याने आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी त्यांच्या ट्विटर बायोवरून इंडिया हा शब्द हटवून त्याऐवजी भारत असं लिहिलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. मात्र, सरमा यांनी आपल्या कृतीचं समर्थनही केलं आहे. इंडिया भारत नाहीये. इंग्रजांनी आपल्या देशाचं नाव इंडिया ठेवलं आहे. आम्ही स्वत:ला वसाहतवाद्यांनी दिलेल्या गोष्टींपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपले पूर्वज भारतासाठी लढले. आपण भारतासाठी काम करत आहोत, असं मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी म्हटलं आहे. हिंमत बिस्वा सरमा यांनी त्यांच्या ट्विटर बायोवरून इंडिया हटवून भारत लिहिलं आहे. चीफ मिनिस्टर ऑफ आसाम, भारत असं त्यांनी लिहिलं आहे.
आपल्या ट्विटर बायोमधून इंडिया काढून भारत लिहिणारे सरमा हे भाजपचे पहिलेच नेते आहेत. सरमा यांच्या या कृतीवर विरोधकांकडून टीका होत असतानाच विरोधकांनी आपल्या आघाडीचं नाव इंडिया ठेवल्याने त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांनीही जोरदार टीका केली आहे. विरोधकांनी केवळ नाव बदललं आहे. चेहरे तेच आहेत. इंडिया विरुद्ध तर भारतच लढेल, असं भाजपचे नेते सुशील कुमार मोदी म्हणाले. तर 2024च्या निवडणुकीत इंडिया विरुद्ध भारत मातेच्या दरम्यानच होईल, असं उपेंद्र कुशवाह म्हणाले.
I.N.D.I.A. Vs Bharat is ??
What say u ? pic.twitter.com/X90mKN6Xt5
— श्रीराम??? (@shriramd7) July 18, 2023
I-INDIAN (इंडियन) – भारतीय
N- NATIONAL (नेशनल) – राष्ट्रीय
D-DEMOCRATIC (डेमोक्रॅटिक) – लोकशाहीवादी
I-INCLUSIVE (इन्क्लूसिव्ह) – सर्व समावेशक
A- ALLIANCE (अलायन्स) – आघाडी
इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी दोघेही 2024च्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांना पराभूत करण्यासाठी कंबर कसून उभे आहेत. कालच्या एनडीएच्या बैठकीला 39 पक्षांचे नेते होते. तर इंडियाच्या बैठकीला 26 पक्षाचे नेते होते. विशेष म्हणजे इंडियाच्या बैठकीला ज्या पक्षांचे नेते उपस्थित होते, ते नेते आणि त्यांचे पक्ष बलाढ्य राजकीय पक्ष म्हणून पाहिले जातात. तर एनडीएच्या बैठकीत सामील झालेले पक्ष अत्यंत छोटे आहेत. ज्यांचा एक खासदार निवडून येण्याची मारामार आहे, अशा पक्षांनाही एनडीएमध्ये सामील करून घेण्यात आलं आहे.