कोस्ट गार्ड म्हणजे भारतीय तटरक्षक दलाने पुन्हा एकदा आपल्या शौर्याचा परिचय दिला आहे. कोस्ट गार्डने सात भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानी तुरुंगात जाण्यापासून वाचवलं. कोस्ट गार्डने पाकिस्तान मेरीटाइम सिक्युरिटी एजन्सीच्या ताब्यातून सात भारतीय मच्छीमारांची सुटका केली. गुजरात किनारपट्टीपासून खोल समुद्रात हा सर्व थरार रंगला. रविवारी दुपारी कोस्ट गार्डला भारतीय नौकेकडून ते अडचणीत असल्याचा सिग्नल मिळाला. भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ मासेमारी प्रतिबंधित क्षेत्राच्या आसपास ही बोट होती.
“रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास नो फिशिंग झोन जवळ असलेल्या भारतीय मच्छीमारी नौकेकडून ते अडचणीत असल्याचा ICG ला सिग्नल मिळाला. कालभैरव नौकेला पाकिस्तानच्या PMSA जहाजाने रोखलं. या नौकेवरील सात भारतीय मच्छीमारांना अटक केली होती” अशी माहिती कोस्ट गार्डने दिली आहे.
सिग्नल मिळताच लगेच Action
कोस्ट गार्डला सिग्नल मिळताच त्यांनी लगेच कारवाई सुरु केली. आपली नौका भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ पाठवली. कोस्ट गार्डने मागे हटावं यासाठी पाकिस्तानी नौकेने प्रयत्न केले. पण भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने पाकिस्तानी बोटीला सागरी सीमेजवळ रोखून धरलं. त्यांना भारतीय मच्छीमारांना सोडण्यासाठी भाग पाडलं. भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी जहाजाला भारतीय मच्छीमारांची सुखरुप सुटका करण्यासाठी भाग पाडलं. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या सगळ्या कारवाई दरम्यान कालभैरव बोटीच नुकसान झालं आहे.
@IndiaCoastGuard rescued 07 fishermen apprehended by Pakistan Maritime Security Agency (PMSA) near the #India #Pakistan maritime boundary on 17 Nov 24. #ICG swiftly responded to a distress call, intercepted PMSA, and ensured the safe return of the crew. #ICG remains committed to… pic.twitter.com/pP1GiTS8SC
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) November 18, 2024
आता चौकशी का?
भारतीय मच्छीमारांना घेऊन कोस्ट गार्डचं जहाज सोमवारी ओखा बंदरात पोहोचलं. आता ICG, गुजरात पोलीस, गुप्तचर यंत्रणा आणि मच्छीमार खात्याकडून चौकशी सुरु आहे. पाकिस्तान मेरीटाइम सिक्युरिटी एजन्सी आणि कालभैरव नौका आमने-सामने कशी आली? त्याचा तपास केला जात आहे.