नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या जेवणात झुरळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. आयआरसीटीसीकडून मागवलेल्या जेवणात झुरळ आढळल्याने प्रवाशी चांगलाच संतप्त झाला. या प्रवाशाने थेट रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर आयआरसीटीसीने सेवा देणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई केली आहे. या प्रवाशाने रेल्वेच्या या भोंगळ कारभाराला वाचा फोडतानाच या अन्नात झुरळ निघाल्याचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.
24 जुलै रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. हा प्रवासी राणी कमलापती (हबीबगंज)- हजरत निजामुद्दीन वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रवाशाने आयआरसीटीसीकडून जेवण मागवलं. ज्यूस आणि दोन पॉकेट जेवणाचे मागवले. त्यात चपाती वगैरे होती. या प्रवाशाने थोडी चपाती खाल्ली.
पण नंतर त्याने चपाती निरखून पाहिली असता त्यात त्याला मेलेलं झुरळ सापडलं. त्यामुळे त्याला मळमळ आणि ओकारी सारखं वाटू लागलं. या घटनेवर त्याने संताप व्यक्त केला. या प्रवाशाने आधी या जेवणाचा फोटो काढला आणि ट्विटरवर वंदे भारत एक्सप्रेसला टॅग करून तक्रार केली. तसेच रेल्वे प्रशासनाकडेही तक्रार केली. रेल्वेत देण्यात येणाऱ्या पदार्थांच्या गुणवत्तेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
प्रवाशाच्या या ट्विटला आयआरसीटीसीने प्रतिसाद दिला आहे. आयआरसीटीसीने या प्रकारावर माफी मागितली आहे. अनाहूतपणे हा दुर्देवी प्रकार घडल्याचं आयआरसीटीसीने म्हटलं आहे. आम्ही हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. तसेच खाद्यपदार्थांची सेवा देणाऱ्या ठेकेदाराला खाद्यपदार्थ देताना काळजी घेण्याची सक्तीची ताकीदही दिली आहे. तसेच ठेकेदाराला दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून किचनची मॉनिटरिंग करण्याचा निर्णय घेतल्याचंही रेल्वेने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित प्रवाशाला दुसरे अन्न पदार्थ देण्यात आल्याचं भोपाळच्या डिव्हिजनल रेल्वे मॅनेजरने स्पष्ट केलं. तसेच संबंधितांवर उचित कारवाई करण्यात आल्याचं प्रवाशाला कळविण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, अनेक प्रवाशांनी अन्नाच्या खराब गुणवत्तेबाबत तक्रारी केलेल्या आहेत. तसेच आयआरसीटीसीने उत्तम क्वालिटीचे अन्न देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
@IRCTCofficial found a cockroach in my food, in the vande bharat train. #Vandebharatexpress#VandeBharat #rkmp #Delhi @drmbct pic.twitter.com/Re9BkREHTl
— pundook?? (@subodhpahalajan) July 24, 2023
दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अन्न पुरवठा करणाऱ्यांना 25 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्यांना कठोर इशाराही देण्यात आला आहे. पुन्हा असा प्रकार घडता कामा नये, अशी तंबीही देण्यात आल्याचं मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली आहे.