श्रीनगर : शुक्रवारी काश्मीरमध्ये थंडीच्या लाटेने लोकांनी घराबाहेर येणे टाळले आहे. थंडीमुळे काश्मीर खोऱ्यातील तलाव आणि पिण्याच्या पाण्याचे पाइप गोठले आहेत. ‘चिल्लई कलान’ नावाच्या 40 दिवसांच्या प्रदीर्घ थंडीचा शुक्रवारी दुसरा दिवस होता. हा कालावधी ३० जानेवारीला संपणार आहे. खोऱ्यातील तलाव गोठले आहेत. श्रीनगर शहरातील दल तलावातील अर्धवट गोठलेल्या पाण्यातून खलाशांनी मार्ग काढला. लोक संपूर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईप्सच्या आजुबाजुला लहान शेकोटी पेटवताना दिसत होते.
“श्रीनगरमध्ये आज किमान तापमान उणे 3.3 अंश सेल्सिअस होते, तर गुलमर्ग आणि पहलगाममध्ये ते अनुक्रमे उणे 1 अंश आणि उणे 4.8 अंश सेल्सिअस होते,” असे हवामान विभागाच्या निवेदनात म्हटले आहे. लडाख विभागातील लेह शहरात किमान तापमान उणे 14.4 अंश होते. कारगिलमध्ये उणे 9.9 आणि द्रासमध्ये उणे 12.3 अंश सेल्सिअस तापमान होते. जम्मू शहरात रात्रीचे किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअस, कटरा येथे 7.9, बटोटे येथे 6.3, भदेरवाहमध्ये 3.5 आणि बनिहालमध्ये 3.8 अंश सेल्सिअस होते.
‘चिल्लई-कलन’ या काळात खूप थंडी असते. चिल्लई-कलन हा 40 दिवसांचा हिवाळा असतो जेव्हा थंडीची लाट या प्रदेशात येते आणि तापमान इतके कमी होते की प्रसिद्ध दल सरोवरासह जलस्रोत गोठतात. सर्वत्र बर्फ दिसते. खोऱ्यातील अनेक भागांना या परिस्थितीचा सामना करावा लागतो. या कालावधीत बहुतेक भागांमध्ये, विशेषत: वरच्या भागात जोरदार बर्फवृष्टी होते. ‘चिल्लई-कलान’ 21 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 31 जानेवारीला संपेल. यानंतर, काश्मीरमध्ये 20 दिवस ‘चिल्लई-खुर्द’ (लहान थंडी) आणि 10 दिवस ‘चिल्लई-बच्छा’ (सौम्य थंडी) कालावधी आहे. या काळात थंडीची लाट कायम असते.
काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते. नद्या आणि तलाव गोठतात. काश्मीरच्या बहुतांश भागात किमान तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले आहे. या काळात बर्फाच्छादित पर्वत, मैदाने आणि पांढरी शुभ्र दिसणारी चिनाराची झाडे संपूर्ण परिसराला सुंदर बनवतात. चिल्लई कलान म्हणजे पर्शियन भाषेत कडक हिवाळा. यावेळी थंडीची लाट शिगेला पोहोचते. प्रसिद्ध दल सरोवरही थंडीमुळे गोठते. यामुळे काश्मिरी लोकांचे दैनंदिन जीवन ठप्प होते.