नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये बुधवारी दहशतवाद्यांशी दोन हात करताना कर्नल मनप्रीत सिंह शहीद झाले. कर्नल मनप्रीत हे पंजाब मोहालीमधील भरऊजानचे रहिवाशी होते. त्यांच्या शहीद होण्याची बातमी समजताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं. कर्नल मनप्रीत यांना ओळखणाऱ्या सर्वांचे डोळे पाणावले. गावातील प्रत्येकाच्या ओठांवर त्यांच्या शौर्याची चर्चा होती. कर्नल मनप्रीत यांनी जे शौर्य दाखवलं, त्या बद्दल भारतीय सैन्याने त्यांना मेडलने सन्मानित केलं होतं. वयाच्या 41 व्या वर्षी कर्नल मनप्रीत यांनी देशासाठी बलिदान दिलं. मनप्रीत यांची आई मनजीत यांना ते शहीद झाल्याची बातमी कळताच त्यांची शुद्ध हरपली. रडून-रडून त्यांची खूप वाईट अवस्था होती. मनप्रीत बालपणापासूनच अभ्यासात अव्वल होता. केंद्रीय विद्यालयात त्यांचं शिक्षण झालं होतं.
शहीद कर्नल मनप्रीत सिंह पंजाब मोहालीमधील न्यू चंदीगड येथील भरऊजान गावचे निवासी होते. सध्या त्यांचं कुटुंब हरियाणाच्या पंचकुला सेक्टर 26 मध्ये राहतं. 2005 साली ट्रेनिंग पूर्ण करुन सैन्यात दाखल झाले. त्यांची पत्नी हरियाणाच्या पंचकुला येथील मोरनीच्या सरकारी शाळेत शिक्षिका आहे. त्यांना सात वर्षाचा मुलगा आहे. मनप्रीत सिंह यांचे वडिल सैन्यात होते. कर्नल मनप्रीत कुटुंबातील मोठे सुपूत्र होते. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. एनडीएत आपल्या बळावर प्रवेश मिळवला होता.
सैन्यात सेकंड इन कमांड
मनप्रीत सिंह वर्ष 2003 मध्ये सैन्यात लेफ्टनंट कर्नल बनले. 2005 साली त्यांना कर्नलच्या पदावर प्रमोट केलं. देशाच्या शत्रुंविरोधात ज्या मोहिमा राबवण्यात आल्या, त्यातील अनेक मोहीमांमध्ये मनप्रीत सिंह यांनी नेतृत्व केलं. वर्ष 2019 ते 2021 दरम्यान कर्नल मनप्रीत सिंह सैन्यात सेकंड इन कमांड पदावर होते. त्यांनी कमांडींग ऑफिसर म्हणून काम केलं होतं. आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत कर्नल मनप्रीत सिंह यांचं पार्थिव मोहाली येथे आणण्यात येईल. शहीद कर्नल मनप्रीत यांचे आजोबा शीतल सिंह, वडील स्व. लखमीर सिंह आणि काका रणजीत सिंह यांनी भारतीय सैन्यात सेवा केली आहे.