नवी दिल्ली : अलीकडे हवामान खात्याचा अंदाज चुकत आहे. यावरुन सोशल मिडीयावर अनेक मीम्स देखील व्हायरल होत आहे. हवामान खात्याचा अंदाज चुकत असल्याची कबुली भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी)( Director General of India Meteorological Department ) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनीच दिली आहे. यामागचे कारण देखील त्यांनी सांगीतले आहे. हवामान बदलामुळे वातावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. या बदलांमुळे अचूक अंदाज घेण्याच्या हवामान खात्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. परिणामी अंदाज चुकत असल्याचे महापात्रा म्हणाले.
जगभरातील हवामान संस्था त्यांचे मॉनिटरिंग नेटवर्क आणि हवामान अंदाज मॉडेल सुधारण्यावर भर देतात. देशात मान्सूनच्या पावसाचा कोणताही स्पष्ट कल नाही, परंतु वातावरणातील बदलामुळे मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, तर हलक्या पावसाच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचे महापात्रा यांनी सांगीतले. 1970 पासून आतापर्यंतच्या दैनंदिन पावसाच्या आकडेवारीचे विश्लेषण करत महापात्रा यांनी सांगीतले की, देशात मुसळधार पावसाच्या दिवसांत वाढ झाली आहे, तर हलक्या किंवा मध्यम पावसाच्या दिवसांत घट झाली आहे.
पाऊस पडत नसेल तर अजिबात होत नाही. आणि जर पाऊस पडत असेल तर खूप पडतो. जेव्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होते तेव्हा पाऊस अधिक तीव्र असतो. भारतासह उष्णकटिबंधीय पट्ट्यातील हा सर्वात महत्त्वाचा ट्रेंड आहे. अतिवृष्टीचे प्रमाण वाढणे आणि हलक्या पावसाचे दिवस कमी होणे हा हवामान बदलाचा परिणाम असल्याचे अभ्यासांनी सिद्ध केले आहे.
1901 पासून आतापर्यंतच्या मान्सूनच्या पावसाची आकडेवारी नुसार मान्सूनमध्ये बदल झाल्याचे दिसते. या अंतर्गत, उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी होत आहे, तर पश्चिम राजस्थानसारख्या पश्चिमेकडील काही भागात पावसात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
मोसमी पावसाचा काही अंदाज नाही. मान्सून अनियमित असून यात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पहायला मिळाले. 27 जुलै रोजी केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मेघालय आणि नागालँडमध्ये गेल्या 30 वर्षांत (1989 ते 2018 पर्यंत) नैऋत्य मान्सूनच्या पावसात लक्षणीय घट झाली आहे. या पाच राज्यांमध्ये आणि अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातही वार्षिक सरासरी पर्जन्यमानात लक्षणीय घट झाल्याचे त्यात म्हटले होते.
येत्या चार दिवसात देशात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे . दक्षिण किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण आणि गोवा, ओडिशा येथे जोरदार पाऊस पडणार आहे. दक्षिण किनारपट्टीसह गोव्याला 8 ते 10 ऑगस्ट तर ओडिशाला 8 ते 9 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गुजरात, छत्तीसगड, गोवा, कोकण, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटक, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यालाही येत्या तीन दिवसांदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा राज्यात जोर वाढणार आहे.