काँग्रेसची लोकसभेची पहिली यादी जाहीर, राहुल गांधींच्या उमेदवारीचा सस्पेन्स अखेर संपला

| Updated on: Mar 08, 2024 | 7:56 PM

काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 39 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राहुल गांधी यांचं देखील नाव आहे.

काँग्रेसची लोकसभेची पहिली यादी जाहीर, राहुल गांधींच्या उमेदवारीचा सस्पेन्स अखेर संपला
Follow us on

नवी दिल्ली | 8 मार्च 2024 : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उमेदवारीबाबत असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. राहुल गांधी यांना पुन्हा वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राहुल गांधी सध्या याच मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. काँग्रेसने आतापर्यंत 39 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत 10 ते 60 उमेदवारांबाबत चर्चा झाली. दिल्ली, छत्तीसगड, तेलंगणा, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, कर्नाटक, केरळ, सिक्किम आणि लक्षद्वीप इत्यादी राज्यांच्या उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. निवडणूक समितीच्या बैठकीनंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत शशी थरुर यांच्या नावाचादेखील समावेश आहे. शशी थरुर यांना तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर डी के शिवकुमार यांना बंगळुरु ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ज्योत्सना महंत यांना कोरबा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांना अलाफूजा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसची मुंबईत मोठी सभा

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो, न्याय जोडो यात्रा 17 मार्चला मुंबईत समाप्त होईल. या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या सभेला इतर विरोधी पक्षांचे नेते तसेच इंडिया आघाडीच्या नेत्यांनादेखील निमंत्रण देण्यात आलं आहे.

दरम्यान, भाजपकडून दोन दिवसांपूर्वीच लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 197 उमेदवारांची नावे आहेत. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नाही. महाराष्ट्राच्या उमेदवारांबाबत सध्या दिल्लीत बैठकांचं सत्र सुरु आहे. महाराष्ट्राच्या उमेदवारांबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 30 पेक्षा जास्त केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.