चंदीगड : काँग्रेसने पंजाबमध्ये नेतृत्वात मोठा खांदेपालट केलाय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर तोडगा म्हणून अखेर पक्षश्रेष्ठींना पंजाब प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची निवड केलीय. विशेष म्हणजे पंजाबमधील राजकीय संतुलन राखण्यासाठी प्रदेशाध्यक्षांसोबत 4 कार्याध्यक्षांचीही नेमणूक करण्यात आलीय (Punjab Congress Crisis). आता या निर्णयानंतर तरी पंजाब काँग्रेसमधील कॅप्टन अमरिंदर सिंह (CM Amrinder Singh) आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्यातील अंतर्गत संघर्ष थांबतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
AICC President Sonia Gandhi appoints Navjot Singh Sidhu as the President of the Punjab Pradesh Congress Committee with immediate effect. pic.twitter.com/c7ggMUSCts
— ANI (@ANI) July 18, 2021
पंजाबमधील वादाबाबत सर्व आमदार आणि मंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी हायकमांडने तीन सदस्याचं पॅनल तयार केलं होतं. काँग्रेस नेते हरिश रावत यांच्या नेतृत्वात हे पॅनल तयार करण्यात आलं. त्यात मल्लिकार्जुन खरगे आणि जेपी अग्रवाल यांचा समावेश आहे. हे पॅनल एकाएका आमदार आणि मंत्र्याशी चर्चा करून त्यांचं म्हणणं ऐकणार आहेत. त्यानंतर हा अहवाल हायकमांडला देण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आहे. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी होत आहे. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवला आहे. हे प्रकरण इतकं वाढलं आहे की, काँग्रेसच्या केंद्रीय समितीला हस्तक्षेप करावा लागला.
पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे हायकमांडने या 25 आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं होतं. या सर्व आमदारांशी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या पॅनलने चर्चा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील झाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंह रंधवा आदींचा या बंडखोरांमध्ये समावेश आहे. निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला काँग्रेसकडून आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करण्यास सुरुवात केली. परिणामी मुख्यमंत्री आणि या आमदारांमध्ये तणाव निर्माण झाला.