काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या कारवर हल्ला, राहुल गांधी यांचाही ताफा अडवला; राहुल यांच्याकडून Flying Kiss

| Updated on: Jan 21, 2024 | 5:58 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ही भारत जोडो यात्रा असाममध्ये पोहोचली आहे. पण असाममध्ये यात्रेला गालबोट लावण्याचा प्रयत्न झालाय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या कारवर हल्ला केला आहे. तर राहुल गांधी यांचीही बस अडवली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या कारवर हल्ला, राहुल गांधी यांचाही ताफा अडवला; राहुल यांच्याकडून Flying Kiss
rahul gandhi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दिसपूर | 21 जानेवारी 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. सध्या राहुल गांधी यांची यात्रा पूर्व भारतात आहे. असाममधून जात असताना भारत जोडो यात्रा मध्येच थांबवली जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी तर त्यांच्या गाडीवर भाजपच्या लोकांना हल्ला केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. असाममध्येच राहुल गांधी यांची बसही जमावाने अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राहुल गांधी यांनी फ्लाइंग किस देऊन जमावाला प्रत्युत्तर दिलं.

जयराम रमेश यांनी ट्विटरवरून एक पोस्ट आणि व्हिडीओ ट्विट करून त्यांच्या कारवर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. काही वेळापूर्वी सुनीतपूरच्या जुमुगुरीहाट येथे माझ्या गाडीवर भाजपच्या लोकांनी हल्ला केला. गाडीच्या विंडशील्डवर लावलेले भारत जोडो यात्रेचे स्टिकरही फाडण्यात आले. हल्ला करणाऱ्याने स्टिकरवर पाणी फेकले. भारत जोडो यात्रेच्या विरोधात घोषणा दिल्या. पण आम्ही संयम ठेवला. आम्ही गुंडांना माफ केलं. पण ते वेगाने आमच्या दिशेने आले. असामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याकडूनच हे सर्व होत आहे, यात काहीच शंका नाही. पण आम्ही घाबरलेलो नाही. आम्ही संघर्ष करत राहू, असं जयराम रमेश यांनी म्हटलंय.

तुमचे गुंड यात्रा रोखू शकत नाही

जयराम रमेश यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी निषेध नोंदवला आहे. आमचा ताफा असाममध्ये रॅलीच्या ठिकाणी चालला होता. तेव्हा जुमगुरीहाटमध्ये मुख्यमंत्री सरमा यांच्या गुंडांनी काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे कॅमेरामन आणि इतर सदस्यांवर हल्ला केला. त्यात दोन महिलांचा समावेश होता. या गुंडांनी जयराम रमेश यांच्या गाडीवरही हल्ला केला. त्यांच्या कारवरील स्टिकर फाडले. त्यावर पाणी फेकले, असं सांगतानाच मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आमची यात्रा रोखू शकत नाही. तुमचे गुंड आमची यात्रा रोखू शकत नाही, असं सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलंय. तर काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.

लोकांना धमकावलं जातंय

राज्यातील सरकार राज्यातील जनतेला धमकावत आहे. भारत जोडो यात्रेत सामील होऊ नका म्हणून सांगत आहे. आमच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जा नाही. आमच्या पक्षाचे झेंडे आणि बॅनर्सची नासधूस केली जात आहे, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.

मोदी मोदींचे नारे

दरम्यान, सोनितपूर जिल्ह्यातून जाणारी राहुल गांधी यांची यात्रा रोखण्यात आली. जमावाने राहुल गांधी यांची यात्रा रोखली. त्यामुळे राहुल गांधी बसमधून उतरले. पण सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी गर्दी पाहता राहुल गांधी यांना बसमध्ये बसण्यास सागितलं. यावेळी जमावाने राहुल गांधी यांच्यासमोरच मोदी मोदीचे नारे लगावले. मात्र, हे सर्व दृश्य पाहून राहुल गांधी यांनी स्मित हास्य केलं. जमावाला पाहून त्यांनी फ्लाइंग किसही दिला.

व्हिडीओत काय?

राहुल गांधी यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मोहब्बत की दुकान खुली है, जुडेगा भारत, जीतेगा हिंदुस्थान असं त्यांनी मह्टलं आहे. या व्हिडीओत जमाव दिसतो. हा जमाव ताफा अडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर राहुल गांधी बसमधून उतरून पुन्हा बसमध्ये चढताना दिसत आहेत.