काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. शेअर बाजारात देशातील सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. एक्झिट पोलच्या दिवशी शेअर मार्केट वाढलं आणि निकालाच्या दिवशी शेअर मार्केट पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीच लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावली होती. 4 जून रोजी काय होणार आहे हे भाजपला माहीत होतं. निवडणुकीचे निकाल काय येणार आहेत हे त्यांना माहीत आहेत. त्यानंतर मार्केट पडलं. हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून याची जेपीसी समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी मीडियाशी संवाद साधताना हा मोठा आरोप केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा घोटाळा उघड केला. एक्झिट पोल आल्यावर आणि आल्यानंतर शेअर मार्केट वेगाने वाढत होते. त्यामागची क्रोनोलॉजी समजून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जून पूर्वी शेअर खरेदी करण्यास सांगितले होते. 4 जून रोजी शेअर मार्केट गगनाला जाऊन भिडेल, असं मोदी म्हणाले होते. मोदींना वास्तव माहीत होतं. तरीही त्यांनी खोटी माहिती दिली. अमित शाह यांनीही 4 जूनपूर्वी शेअर खरेदी करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर मीडियाने खोटे एक्झिट पोल आला. भाजपच्या ऑफिशियल सर्व्हेत त्यांना 220 जागा मिळतील हे माहीत होतं. भाजपच्या नेत्यांना ही माहिती मिळाली होती. इंटेलिजन्सनेही भाजपला 220 जागा मिळतील असं सांगितलं होतं. पण तरीही मोदी आणि शाह यांनी खोटी माहिती देऊन शेअर खरेदी करण्यास सांगितले. कुणाचा तरी त्यांना फायदा करायचा होता, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
मोदी आणि शाह यांच्या आवाहनानंतर 31 मे रोजी मार्केट डबलने वाढलं. त्यानंतर 3 जून रोजी मार्केट वाढतं. 4 जून रोजी मार्केट पडतं. हे कोण लोक आहेत? घपला होणार हे त्यांना माहीत होतं. हजारो कोटी रुपये या ठिकाणी गुंतवले गेले. फॉरेन गुंतवणुकदारांनीही गुंतवणूक केली. त्यानंतर 30 लाख कोटी रुपये बुडाले. रिटेल गुंतवणूकदारांचं नुकसान झालं. हा स्टॉक मार्केटमधील सर्वात मोठा स्कॅम आहे. निवडणुकीत किती जागा येतील हे माहीत असूनही मोदी आणि शाह यांनी शेअर खरेदी करायला लावले. त्यामुळे या सर्व प्रकरणाची जेपीसी चौकशी झाली पाहिजे. हा मोठा घोटाळा आहे. हा गुन्हेगारी स्वरुपाचा गुन्हा आहे. मोदी, शाह, एक्झिट पोल करणारे आणि परदेशी गुंतवणूकदार यांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त अदानी यांच्या चॅनललाच मुलाखती दिल्या. त्या का? या सर्व गोष्टी बाहेर आल्या पाहिजे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चार प्रश्नही विचारले.
देशातील लोकांना गुंतवणुकीचा सल्ला का दिला?
5 कोटी लोक गुंतवणूक करतात. त्यांना स्टॉक खरेदी करण्याचा आदेश का दिला?
दोन्ही मुलाखती झाल्या. त्या अदानीच्या चॅनलला दिल्या. या चॅनल्सची सेबीची चौकशी सुरू आहे. त्या चॅनलचा मार्केट पडण्यात रोल काय?
फेक गुंतवणुकदार आणि फॉरेन गुंतवणुकदारांचा काय संबंध आहे?