नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयच्या अटकेनंतर सिसोदिया यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. अबकारी धोरण घोटाळ्यात सिसोदिया यांना तुरुंगात जावं लागलं आहे. सिसोदिया यांच्या अटकेनंतर सर्वच विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी तर भाजपकडून क्लीनचिट मिळालेल्या नेत्यांची यादीच जारी करून भाजपला कोंडीत पकडलं आहे.
ज्या नेत्यांना भाजपने क्लीनचिट दिली आहे. त्यातील काही लोक सध्या केंद्रात मंत्री आहेत. तर काही लोक मुख्यमंत्री आहेत. ही यादी ट्विटरवर जाहीर केल्यानंतर शशी थरूर यांनी एक पोस्टही लिहिली आहे. चर्चा होत आहे. त्यामुळे जे माझ्याकडे आलं ते शेअर करत आहे. नेहमीच ना खाऊंगा, ना खाने दुंगा या घोषणेचं आश्चर्य वाटतं. मला वाटतं ही घोषणा केवळ बीफच्या अनुषंगानेच असावी, असा चिमटा शशी थरूर यांनी काढला आहे.
थरूर यांनी शेअर केलेल्या यादीत राज्यसभेतील खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव आहे. याशिवाय कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांचंही नाव आहे. आसामचे सीएम हिमंता बिस्वा सरमा, लोकसभेतील शिवसेनेच्या (शिंदे गट) खासदार भावना गवळी, शिवसेनेचे माजी नगरसेवक यशवंत जाधव, शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव आणि प्रताप सरनाईक यांचीही नावे आहेत. कायद्यासमोरील हीच काय समानता आहे? असा सवालही त्यांनी या पोस्टमधून केला आहे.
भाजपमध्ये येण्यापूर्वी नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. राणेंवर 300 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप होता. 2016मध्ये अविघ्न ग्रुपसोबत मिळून 300 कोटी रुपयांची मनी लाँड्रिंग केल्याचा राणेंवर ईडीने आरोप ठेवला होता. मात्र, 2017मध्ये राणेंनी काँग्रेस सोडली. त्यानंतर स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यानंतर राणेंनी 2019मध्ये आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला. त्यानंतर ते राज्यसभेत खासदार झाले आणि केंद्रात मंत्रीही झाले, अशी माहिती ट्विटमध्ये दिली आहे.
खासदार भावना गवळी या आता शिंदे गटात आहेत. ईडीचे 5 समन्स आल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली होती. आता त्या शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या लोकसभेत मुख्य प्रतोद आहेत.
This is going around, so sharing as received. Always wondered about the meaning of न खाऊँगा न खाने दूँगा. I guess he was only talking about beef! pic.twitter.com/oggXdXX8Ac
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 28, 2023
यशवंत जाधव हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. ते मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव शिवसेनेच्या आमदार आहेत. जाधव कुटुंबाच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. त्यानंतर ते शिंदे गटात गेले. त्यानंतर या केसचं काय झालं? असा सवाल थरूर यांनी विचारला आहे.
प्रताप सरनाईकही आमदार आहेत. ते शिवसेनेत असताना त्यांच्या घरावर ईडीची धाड पडली होती. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. आता शिंदे गटात आहेत. त्यांची केस बंद आहे, असं थरूर यांनी म्हटलं आहे.