लोकसभा निवडणुकीच्या 1 जून रोजी शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे. पण संपूर्ण देशाला आता 4 जूनची प्रतीक्षा आहे. 4 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून NDA की INDIA आघाडी कोणाचं नशीब खुलणार हे कळणार आहे. पण काँग्रेसचे दिग्गज नेते जयराम रमेश यांनी त्याआधी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, इंडिया आघाडीला बहुमत मिळताच ते 48 तासांच्या आत पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करणार आहेत.
इंडिया आघाडीत ज्यांच्या जागा अधिक त्या पक्षाचा पंतप्रधान असेल. 2004 मध्ये 13 मे रोजी निकाल आले होते. आणि 17 मे रोजी डॉ. मनमोहन सिंह यांचं नाव समोर आलं होतं. आता इंडिया आघाडीला बहुमत मिळेल आणि निकालानंतर 48 तासांच्या आत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची निवड होईल असा दावा त्यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी 400 पारचा नारा दिलाय तर काँग्रेसनंही बहुमताची 272 ची मॅजिक फिगर पार केल्याचा विश्वास व्यक्त केलाय. काँग्रेसनं पंतप्रधानपदाचा उल्लेख करुन, एक पत्ता उघड केला आहे. विशेष म्हणजे निकालाच्या 2 दिवस आधीच म्हणजे 1 जूनला दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक आहे. ज्यात शरद पवार, उद्धव ठाकरेंपासून इतर राज्यातलेही इंडिया आघाडीचे नेते हजर असतील. या बैठकीत निकालावरुन मंथन होईल आणि पुढची रणनीतीही ठरेल. पण जर इंडिया आघाडीला बहुमत मिळालंच तर पंतप्रधान पदाचा चेहरा कोण ? हा प्रश्न तर आहेच.
काँग्रेसची पहिली पसंद अर्थातच राहुल गांधीच आहेत. राहुल गांधींच्या नावावर काँग्रेसमध्ये एकमत आहे. पण इंडिया आघाडीचं एकमत होईल का ? हाही प्रश्न आहे. दुसरा चेहरा आहेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे. पण खर्गेंनाही वाटतंय की राहुल गांधींनीच पंतप्रधान व्हावं.
तिसरा चेहरा आहे ममता बॅनर्जी यांचा. तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीत सहभागी नसली तरी आपला बाहेरुन पाठिंबा असेल असं दीदींनी स्पष्ट केलंय. आता चौथा चेहरा पुन्हा अर्थशास्त्री असू शकतो. ज्या पद्धतीनं मनमोहन सिंहांचं नाव समोर आलं होतं, त्याचप्रमाणं याही वेळी सर्वसहमतीसाठी तसं नाव पुढं येवू शकतं.
NDA चं सरकार आलं तर मोदीच पंतप्रधान होणार यात शंका नाही. पण निवडणुकीआधी इंडिया आघाडीनं चेहरा घोषित केला. कारण तसं झालं असतं तर मोदी विरुद्ध इंडिया आघाडीचा चेहरा अशी लढत झाली असती.
इकडे महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं, तर भाजपला अवघ्या 8 जागा मिळतील असा दावा विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी केलाय. निकालासाठी आता अवघे 4 दिवस बाकी आहेत. त्यामुळं देशाच्या जनतेनं कौल कोणाला दिला आहे, हे 4 जूनला स्पष्ट होईल आणि त्यासोबतच पंतप्रधानपदी कोण बसणार हेही समोर येईल.