नवी दिल्ली: काँग्रेस अंतर्गत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कार्य समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत काही राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांवर चर्चा होणार आहे. तसेच सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असून आजच्या बैठकीत नव्या अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अध्यक्षपदाबाबत काँग्रेस काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
काँग्रेसच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात ही बैठक होणार आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या माहितीनुसार या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांसह संघटनात्मक निवडणुकांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीत उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
तब्बल 18 महिन्यानंतर काँग्रेसची पहिली ऑफलाईन बैठक होत आहे. या बैठकीत निवडणुकांसह विद्यमान राजकीय घडामोडींवरही चर्चा होणरा आहे. या बैठकीत उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसेवरही चर्चा होणार आहे. लखीमपूर हिंसेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला होता. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या मुद्द्यावरून दोन्ही सरकारांना घेरलं होतं. या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या घटनेची निपक्ष चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
आजच्या बैठकीत पक्षाध्यक्ष निवडीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या जी-23 गटाच्या नेत्यांनी पक्षाध्यक्ष नियुक्त करण्याची मागणी केली होती. तसेच पक्षात संघटनात्मक निवडणुका घेण्याची मागणीही केली होती. निवडणुकीनंतरच अध्यक्ष निवडण्याची मागणीही यावेळी केली जात आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असून नव्या अध्यक्षपदावर निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. काही नेत्यांनी तर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यावी, अशी मागणी केली आहे.
आजच्या बैठकीत इतर संघटनात्मक निवडणुका घेण्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तसेच जी-23 गटाच्या नेत्यांकडून आयत्यावेळी काही मुद्दे उपस्थित केले जाण्याची शक्यता असून त्याला हायकमांड कसे उत्तर देणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत गोवा आणि पंजाबमधील पक्षाच्या स्थितीवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 16 October 2021 https://t.co/USApX9K4fX #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021
संबंधित बातम्या:
ठाकरे म्हणाले मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, फडणवीस म्हणतात मग रावते, राणे, राज ठाकरेंचं काय केलं?
उद्धव ठाकरे म्हणाले सरकार पाडून दाखवा, फडणवीस म्हणतात, पडेल तेव्हा कळणारही नाही!
(