नवी दिल्लीः साऱ्या देशभर कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने थैमान घातले. लाखो जणांना प्राण गमावावे लागले. अनेकांचे आप्तेष्ट या साथीने हिरावून नेले. हा हाहाकार इतका भयंकर होता की, स्मशानात प्रेत जाळण्यासाठीही रांगा लावाव्या लागल्या. मात्र, यावरही आपण निर्धाराने मात केली. सगळ्या संकटांना पुरून उरलो. या कामी सर्वात मोठी मदत झाली, ती लसीकरणाची. आता केंद्राने काही नवीन नियम सांगितलेत. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्यास त्याला 3 महिने लस किवा बूस्टरचा डोसही घेता येणार नाहीय. जाणून घेऊयात केंद्राने राज्यांना लसीकरणाबाबत (Vaccination) काय सूचना दिल्या आहेत ते.
काय आहे पत्र?
केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याचे अप्पर सचिव विकास शील यांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरण सुरू झाले आहे. हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्सना खबरादरी म्हणून बूस्टर डोस देण्यात येत आहे. 60 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांनाही लसीकरणाचे 9 महिने झाल्यानंतर बूस्टर डोस देण्यात येत आहे. मात्र, लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या शिफारसीनुसार आता कोरोना झालेल्या व्यक्तीचे लसीकरण किंवा बूस्टर डोस हा पुढे ढकलण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विभाग, अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे, अशा सूचना दिल्या आहेत.
12-14 वयोगटाचे लसीकरण कधी?
12-14 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे कोविड लसीकरण (Corona Vaccination) चक्क पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे, अशी माहिती डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली आहे. डॉ. अरोरा हे लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड -19 कार्यगटाचे अध्यक्ष आहेत. आता त्यांनीच हिरवा कंदील दाखवल्यामुळे हे लसीकरण सुरू होण्याचा मोठा मार्ग रिकामा झाला आहे. डॉ. अरोरा म्हणाले की, आम्ही 15-17 वयोगटातील सर्व 7.4 कोटी किशोरवयीन मुलांना जानेवारीच्या अखेरीस पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आम्ही त्यांना फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून दुसऱ्या डोससह लसीकरण सुरू करू शकू आणि फेब्रुवारीच्या अखेरीस दुसरा डोस पूर्ण करू शकू. त्यानंतर 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीपासून लसीकरण सुरू होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
12 ते 17 वयोगटातील किशोरवयीन मुलेंही प्रौढांसारखीच असतात, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे हा निर्णयत त्यातही प्रामुख्याने 15-17 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे संरक्षण करण्यासाठी हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या वयोगटातील सर्व मुलांचे लसीकरण झाल्यानंतर, सरकार पुढील वयोगटाचा समावेश करण्याचा धोरणात्मक निर्णय घेईल. त्यात 12 ते 14 वयोगटातील किशोरवयीन मुलांचा समावेश असू शकतो.
– डॉ. एन. के. अरोरा, अध्यक्ष, राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार कोविड -19 कार्यगट
Asian Games मध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या फुटबॉलपटू सुभाष भौमिक यांचे निधन