नवी दिल्ली : देशात कोरोनाचे 158 कोटी डोस दिले गेले आहेत. मात्र, गर्भवती महिला आणि गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या महिला कोरोना लस (Corona Vaccine) घेण्यापासून कुचराई करत आहेत. आतापर्यंत फक्त 20 टक्के गर्भवती महिलांनी (Pregnant Women) कोरोनाची लस घेतली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते गर्भवती महिला किंवा गर्भधारणेचा विचार करणाऱ्या महिलांनीही कोरोना लस घेतली नाही तर त्यांना आणि त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी कोव्हॅक्सिन लस घेण्याचा सल्लाही तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन अर्थात NTAGI चे चेअरमन डॉ. एन. के. अरोरा यांच्या मते कोरोना लस घेतलेली नसेल आणि कोरोनाची लागण झाल्यास गर्भवती महिलांना अनेक प्रकारच्या गंभीर परिणांनामा सामोरं जावं लागू शकतं. प्रेगन्सी दरम्यान कोरोना संक्रमण झालं तर गर्भवती महिलांना आयसीयूमध्ये भरती करण्याचीही वेळ येऊ शकते. तसंच वेळेपूर्वी प्रेगन्सी होण्याचीही शक्यता वाढते. त्याचबरोबर जन्मावेळी बाळाचं वजन कमी असण्याचीही शक्यता तयार होते.
देशात दरवर्षी साधारण 2 कोटी 70 लाख महिला बाळांना जन्म देतात. तर 75 लाख महिला गर्भधारणेसाठी प्लानिंग करत असतात. या हिशेबाप्रमाणे गर्भवती महिलांपैकी केवळ 20 टक्के महिलांनी कोरोना लस घेणे चिंताजनक आहे. मध्य प्रदेशातील हा आकडा देशात सर्वाधिक आहे. तिथे आतापर्यंत 33 टक्के महिलांनी कोरोना लस घेतली आहे. अन्य देशात गर्भवती महिलांवरील कोरोना लसीची ट्रायल पाहिल्यानंतर भारत सरकारनं जुलै 2021 पासून देशातील गर्भवती महिलांनाही कोरोना लस देण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, गर्भधारणा आणि कोरोनाचा नेमका डेटा नसल्यामुळे गर्भवती महिलांना कोरोना लस घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती हे सांगणं कठीण आहे. मात्र आदर्शपणे पहिल्या तिमाहीत लसीचा कोणताही डोस टाळला पाहिजे. ज्या गर्भवती महिला पहिल्या तिमाहीत आहेत त्यांचा गर्भ विकासाच्या अवस्थेत असल्यामुळे त्यांनी लस घेण्यासाठी वाट पाहावी, असा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र, ऑर्गोजनेसिस पूर्ण झाल्यानंतर गर्भवती महिलांना लस घेण्याचा सल्ला देण्यात येतो. मग ती लस कोव्हॅक्सिन असेल वा कोविशिल्ड… मात्र, जर तुम्हाला रक्ताच्या गुठल्या होण्याचा त्रास झाला असेल तर तुम्हाला कोव्हॅक्सिन लस घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिली जात आहे.
इतर बातम्या :