नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये आता झपाट्याने वाढ होताना दिसतेय. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविड 19 चे विक्रमी 5,335 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे सक्रीय रुग्णांची संख्या ही 25,587 वर पोहोचली आहे. गेल्या अनेक दिवसानंतर देशात एकाच दिवसात 5000 हून अधिक कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ज्यामुळे चिंता वाढल्या आहेत. सरकारही यावर नजर ठेवून आहे.
बुधवारी कोरोनाचे 4435 नवीन रुग्ण वाढले होते. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने अनेक राज्यांच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्याही वाढली आहे. पण दुसरीकडे कोविड लसीचा अभाव चिंतेचा विषय बनला आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने कोरोनावरील लसीची मागणीही वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा आहे. यूपी, बंगालसह अनेक राज्यांमधील सरकारी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध नाही. हिमाचल, जम्मू, पंजाब आणि बिहारमध्येही लसींचा तुटवडा जाणवत आहे.
देशात 23 सप्टेंबर रोजी 5,383 रुग्ण वाढले होते. त्यानंतर आज ही संख्या ५ हजारांच्या वर गेली आहे. 13 जणांचा देशात मृत्यू झाला आहे. यापैकी कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रत्येकी दोन तर केरळ-पंजाबमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळनेही सात जुन्या मृत्यूंची यादी अपडेट केली आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 5 लाख 30 हजार 929 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत देशात एकूण पाच लाख 30 हजार 916 मृत्यू झाले आहेत. INSACOG ने सांगितले की, नवीन व्हेरिएंट देशातील 38 टक्के संसर्गाच्या प्रसारासाठी जबाबदार आहे.
INSACOG च्या मते, विषाणूचा एक नवीन प्रकार, XBB.1.16, भारताच्या विविध भागांमध्ये आढळून आला आहे, आजपर्यंत त्याचे 38.2% संक्रमण आढळले. गेल्या मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये एक्सबीबी फॉर्म सर्वाधिक आढळून आला आहे. देशाच्या काही भागांमध्ये, BA.2.10 आणि BA.2.75 उपप्रकार देखील आढळून आले, जे XBB प्रमाणेच, Omicron स्वरूपातून घेतलेले आहेत.
देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये संसर्ग वेगाने वाढला आहे, परंतु येथे रूग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढलेली नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, ज्यांना घरी एकटे राहण्याचा सल्ला दिला जात आहे. ज्या लोकांना आधीच इतर आजार आहेत, त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे निश्चितपणे मध्यम ते गंभीर स्थितीत नोंदवली जात आहेत.