Corona Update : देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये आता घट होऊ लागली आहे. यामुळे देशभरातील लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांमध्ये ही घट दिसून येत आहे. याआधी दररोज कोरोनाचे 700 हून अधिक रुग्ण वाढत होते. ही संख्या आता 200 च्या खाली आली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 4500 वरुन आता 2800 वर पोहोचली आहे. आता समोर येत असलेल्या कोविड-19 च्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत.
जागतिक स्तरावर दररोज सरासरी 50 हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. भारतात आता दररोज सरासरी 429 रुग्ण आढळत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या 90% रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी केवळ 0.5% रुग्णांना ऑक्सिजनच्या आधाराची आवश्यकता लागली. कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी केवळ 0.3% रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
सर्वाधिक रुग्ण आढळत असलेल्या केरळमध्ये सर्वाधिक घट दिसून आली आहे. येथे 1,109 कोविड प्रकरणे नोंदवली गेली होती जी गेल्या आठवड्यापर्यंत केवळ 452 पर्यंत कमी झाली आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोविडची प्रकरणे झपाट्याने वाढत होती परंतु आता तेथेही घट झाल्याचे दिसून आले आहे. कर्नाटकमध्ये सर्वाधिक कोविड प्रकरणे नोंदवली जात होती, जी 1,583 वर आली आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही कोविड रुग्णांमध्ये घट झाली आहे.
गेल्या 24 तासांत २६९ नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय तीन जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी देशात 180 नवीन रुग्ण आढळले आणि महाराष्ट्रात तीन लोकांचा मृत्यू झाला, तर आज देशात 269 नवीन रुग्ण आढळले. याशिवाय केरळमध्ये दोन आणि महाराष्ट्रात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या आता 4.4 कोटींवर गेली आहे. राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर 98.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. 220.67 कोटी डोस देशभरात आतापर्यंत देण्यात आले आहेत.