Cyclone Fengal: फेंगल चक्रीवादळाचा तडाखा बसायला सुरुवात, मुसळधार पावसाने झोडपलं

| Updated on: Nov 30, 2024 | 7:58 PM

फेंगल चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे छतावरचे पत्र उडून गेले आहेत. फेंगलचा परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे. फेंगलमुळे हवामान खात्याने हाय अलर्ट घोषित केला आहे. किनारी भागावर काही तासात तो धडकणार आहे.

Cyclone Fengal: फेंगल चक्रीवादळाचा तडाखा बसायला सुरुवात, मुसळधार पावसाने झोडपलं
Follow us on

Cyclone Fengal : चक्रीवादळ फेंगल जसं जसं पुढे सरकतंय तसा त्याचा परिणाम दिसू लागला आहे. शनिवारी दुपारपासून हवामानात बदल झाला आहे. चक्रीवादळ हे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. तामिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे. आंध्र प्रदेशातही पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे चेन्नई विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे.

चक्रीवादळामुळे आधीच हायअलर्ट

फेंगल चक्रीवादळामुळे आधीच हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. आज संध्याकाळीपर्यंत ते पुद्दुचेरी आणि उत्तर तामिळनाडू किनारपट्टीवर धडकणार आहे. 30 नोव्हेंबर आणि 01 डिसेंबर रोजी किनारपट्टीवर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळ हे ताशी 70-80 किलोमीटर वेगाने पुद्दुचेरीजवळ कराईकल आणि महाबलीपुरम येथे सरकत आहे. बंगालच्या उपसागरावरील दाबाने चक्रीवादळाचे रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. आयएमडीने आंध्र प्रदेशातच्या किनारपट्टी भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा ही दिला आहे.

चक्रीवादळामुळे या भागात 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात असा ही इशारा देण्यात आला आहे. फेंगल चक्रीवादळाच्या प्रभाव आता वाढू लागला आहे. तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक भागात जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. फेंगल चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने सुमारे 12 लाख रहिवाशांना एसएमएसद्वारे अलर्ट पाठवून सतर्क राहण्यास सांगितले आहे.

चक्रीवादळामुळे चेन्नई विमानतळावरील उड्डाण बंद ठेवण्यात आली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही फ्लाइट्सचे वेळापत्रक यामुळे प्रभावित झाले आहे. काही उड्डाणे वळवण्यात आली आहेत. 18 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. काही उड्डाणं उशिराने होणार आहेत.


केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमधील सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. NDRF ची टीम ही या ठिकाणी पोहोचली आहे. फेंगल चक्रीवादळामुळे लोकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ न जाण्याचं आवाहन केले आहे. यामुळे पर्यटनस्थळे ही बंद ठेवण्यात आली आहे.