नवी दिल्ली, पुणे | 4 डिसेंबर 2023 : भारतीय किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालचा उपसागरात कमी दाबाचा टप्पा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. आता हे मिचौंग चक्रीवादळ मंगळवारी पाच डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशामधील नेल्लोर आणि मछलीपट्टणम किनारपट्टीवर धडकणार आहे. सोमवारी हे वादळ उत्तर तामिळनाडूत आले आहे. या वादळामुळे किनारपट्टीवर ११० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. सध्या चक्रीवादळ पुडुचेरीपासून 250 किमी पूर्व-दक्षिणपूर्व, चेन्नईपासून 230 किमी पूर्व-दक्षिणपूर्व, नेल्लोरपासून 350 किमी दक्षिणपूर्वमध्ये आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रवर होणार आहे.
नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ चक्रीवादळ ३ डिसेंबर निर्माण झाले.चक्रीवादळामुळे १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुडुचेरीत एनडीआरएफच्या २१ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच आठ अतिरिक्त टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत. चक्रीवादळाच्या धोक्यामुळे केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
चक्रीवादळाच्या धोका लक्षात घेऊन 118 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये हावड-चेन्नई एक्सप्रेस, शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस, पुडुचेरी-हावडा एक्सप्रेस, एलेप्पी-धनबाद एक्सप्रेस, टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेस, कन्याकुमारी-डिब्रूगढ विवेक एक्सप्रेस, चेन्नई-पुरी एक्सप्रेस यांचा समावेश आहे. तामिळनाडूत 4,967 बचाव शिबिर तयार करण्यात आले आहे. राज्य सरकारने चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपूरम आणि चेंगलपट्टूमध्ये सार्वजिनक सुटी जाहीर केल आहे.
‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस पडणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे. आता पुन्हा पावसाचा अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. दरम्यान राज्य सरकारने यापूर्वी झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.