दादरा नगर हवेली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी घुमली. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा प्रचंड विजय झाला. तब्बल 50 हजाराच्या मताधिक्याने डेलकर विजयी झाल्या. शिवसेनेचा हा महाराष्ट्राबाहेरचा पहिलाच विजय असून या निमित्ताने शिवसेने महाराष्ट्राबाहेर विजयाचं खातं खोललं आहे.
दादरा नगर हवेलीतील माजी खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे लोकसभेची ही जागा रिक्त झाली होती. कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने कलाबेन यांना तिकीट दिलं होतं. आज झालेल्या मतमोजणीत कलाबेन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार महेश गावीत यांचा 47 हजार 447 मतांनी पराभव केला.
आज सकाळी साडे आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण 22 राऊंड पार पडले. यावेळी कलाबेन यांना एकूण 1,12,741 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महेश गावीत यांना 63 हजार 382 मते मिळाली.
दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईत आत्महत्या केली होती. मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचे महाराष्ट्र विधानसभेत पडसादही उमटले होते. मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते.
कलाबेन यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. कलाबेन यांनी अगदी पहिल्या फेरीपासूनच 9 ते 12 हजार मतांची आघाडी कायम ठेवली होती.
दादरा नगर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. राऊत यांनी दादरा नगर हवेलीत झंझावाती प्रचार केला होता. डोअर टू डोअर कॅम्पेन, रॅली आणि प्रचार सभांवर त्यांनी अधिक जोर दिला होता. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही प्रचारात भाग घेतला होता. कलाबेन डेलकर यांनीही प्रचाराचं रान उठवलं होतं. तसेच प्रचाराचा नियोजनबद्ध कार्यक्रम आणि मतदारांचा कौल यामुळे त्यांचा विजय सोपा झाला.
दरम्यान, भाजप नेते आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार महेश गावीत यांच्यासाठी जोरदार प्रचार केला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला आदी भाजप मंत्र्यांनीही गावीत यांच्यासाठी झंझावाती प्रचार केला होता. मात्र, दादरा नगर हवेलीतील नागरिकांनी या सर्वांना नाकारून डेलकर यांच्या पारड्यात मतांची बेगमी केली.
शिवसेनेचं दिवाळीला सीमोल्लंघन, राज्याबाहेर पहिला खासदार
दादरा नगर हवेलीच्या जनतेनं कलाबेन डेलकर यांना विजयी केलं आहे. कलाबेन डेलकर यांना 1 लाख 16 हजार 834 तर भाजपच्या महेश गावित यांना 66 हजार 157 मतं मिळाली आहेत. BJP उमेदवाराचा 50 हजार 677 मतांनी पराभव #BJP | #Shivsena | pic.twitter.com/aKPi0ysdpq— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2021
संबंधित बातम्या: