मुसळधार पावसात दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना, छत कोसळल्याने एकाचा मृत्यू, 8 जखमी

| Updated on: Jun 28, 2024 | 9:17 AM

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे एक मोठा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसात टर्मिनल 1 च्या छताचा काही भाग कोसळला. विमानतळाचे छत कोसळल्याने अनेक वाहने त्याखाली दबली गेली. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. बचावकार्य सुरू करण्यात आले.

मुसळधार पावसात दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना, छत कोसळल्याने एकाचा मृत्यू, 8 जखमी
Follow us on

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे एक मोठा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसात टर्मिनल 1 च्या छताचा काही भाग कोसळला. विमानतळाचे छत कोसळल्याने अनेक वाहने त्याखाली दबली गेली. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. बचावकार्य सुरू करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता झाला. विमानतळाचे छत कोसळल्याने अनेक वाहने त्याखाली चिरडली गेली आणि या अपघातात 6 जण जखमी झाले. सर्व जखमींना वाचवण्यात आले असून त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर डोमेस्टिक विमानतळ टर्मिनलबाहेर मोठी वाहतूक कोंडी झाली. दूरदूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. टर्मिनलचे छत कसे कोसळले याचा सध्या पोलिस तपास करत आहेत.

 

DIAL (दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड) च्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘सध्या टर्मिनल-1 वरून सर्व प्रस्थान (departure) रद्द करण्यात आले आहेत. चेक इन काउंटरही बंद करण्यात आले आहे. यापुढे काही काळासाठी येथून चेक-इन होणार नाही अथवा प्रस्थान होणार नाही. त्यासाठी दुसऱ्या टर्मिनलवर जावे लागेल. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या अपघाताचे काही फोटो, व्हिडीओही समोर आले असून छत कोसळल्यामुळे त्याखाली दबल्या गेलेल्या गाड्यांची काय दुरावस्था झाली आहे, त्याचे विदारक दृश्य त्यामध्ये दिसत आहे. ज्या गाड्यांचे नुकसान झाले, त्यामध्ये बहुतांश गाड्या या टॅक्सी आहेत. नेमक्या किती गाड्यांचे नुकसान झालंय, ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

“सकाळी 5.30 च्या सुमारास आम्हाला दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 वर छत कोसळल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. तेथे आग लागल्याचे दिसून आले. यानंतर विमानतळाच्या छताचा काही भाग कोसळला. खाली मोठ्या प्रमाणात वाहने उभी होती. अनेक वाहने छताच्या ढिगाऱ्याखाली दाबली गेली. या घटनेत 6 जण जखमीही झाले आहेत. आम्ही त्यांना वाचवले आणि जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले” असे अग्निशमन दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

 

अनेक फ्लाईट्स रद्द

दिल्ली विमानतळावर झालेल्या या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले तसेच गाड्याही दबल्या गेल्याने मोठे नुकसान झाले. मोठ्या मुश्किलीने तेथे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे तसेच दिल्लीत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे टर्मिनल-1 येथून होणारे प्रस्थान बंद करण्यात आले आहे. सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत तसेच तेथील चेक-इन काऊंटरही बंद करण्यात आले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीपासून आत्तापर्यंत दिल्ली विनातळावरून उड्डाण करणारी 16 तर विमानतळावर येणारी 12 विमानं रद्द करण्यात आली आहेत.

 

स्पाइसजेटची उड्डाणे रद्द

“खराब हवामानामुळे (मुसळधार पाऊस) स्पाईसजेटची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. पर्यायी ऑप्शनसाठी किंवा पूर्ण रिफंडसाठी आमच्याशी +91 (0)124 4983410/+91 (0)124 7101600 या नंबरवर संपर्क साधा किंवा http://changes.spicejet.com या वेबसाईटला भेट द्या. पुढील अपडेट्ससाठी आमच्या सोशल मिडिया चॅनलवर नजर ठेवा, असे स्पाईसजेटतर्फे सांगण्यात आले आहे.