Delhi Assembly Election 2025: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जोरदार कामगिरी करणाऱ्या भारतीय जनता पक्षासाठी चांगली बातमी आली आहे. दिल्ली विधानसभेसाठी 27 वर्षांपासून सुरु असलेला भाजपचा राजकीय वनवास संपण्याची चिन्हे दिसत आहे. या निवडणुकीत दिल्लीकर भाजपला संधी देणार असल्याचा सर्व्हे आला आहे. त्यामुळे ‘आप’ची चिंता वाढली आहे. या सर्व्हेतून भाजप सत्ता स्थापन करण्याचा जवळ पोहचत आहे.
‘टाइम्स नाऊ जेवीसी’चा ओपिनियन पोल आला आहे. या पोलमध्ये ‘आप’ आणि भाजपमध्ये ‘कांटे की टक्कर’ दिसत आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीत 70 मधून 67 आणि 62 जागा जिंकणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला जबरदस्त फटका बसताना दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने 7 टक्के मते घेतली तर भाजपचा विजय निश्चित दिसत आहे. सर्व्हेमधून भाजप आणि ‘आप’ यांच्यात सत्तेसाठी संघर्ष दिसत आहे. ‘आप’ला 33-37 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 33 ते 36 जागा मिळण्याचे संकेत सर्व्हेमधून समोर आले आहे. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावा लागणार आहे.
काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ‘रेवाडी कार्ड’ बाहेर काढला आहे. काँग्रेसने जनतेमध्ये ‘रेवाडी कार्ड’चा जोरदार प्रचार केला तर ‘आप’ला 44.74 टक्के मते मिळतील आणि भाजप 46.16 टक्के मते मिळू शकतात. काँग्रेसला 7.5 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. यामुळे आम आदमी पक्ष बहुमताच्या खाली घसरण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला 27 ते 33 जागा मिळू शकतात. त्याच वेळी, भाजप 37-41 जागा जिंकून सरकार स्थापन करता येईल. काँग्रेस अजूनही 0-2 जागांवर राहू शकतो.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आठ फेब्रुवारी रोजी निवडणूक निकाल येणार आहेत. निवडणुकीसाठी प्रचार रंगात आला आहे. या निवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये नाही तर भाजप आणि आम आदमी पक्षात आहे.