नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संयमाचा बांध आज अखेर प्रजासत्ताक दिनी फुटला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीसाठी दिल्ली पोलिसांनी काही अटी ठेवल्या होत्या. मात्र, या अटींना धुडकावत शेतकरी दिल्लीत शिरले. दिल्ली पोलीस मुख्यालय ते राजपथाबाहेर आंदोलक शेतकरी धडकले. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला. अनेक आंदोलकांकडून पोलिसांवार दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले. आंदोलकांचं उग्र रुप पाहता पोलिसांनीदेखील आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांवर लाठीचार्ज सुरु केला. अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. या भयानक हिंसक वातावरणाने संपूर्ण दिल्ली हादरली (Delhi Farmers agitation turns violent).
काय काय झालं?
शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांचा एक जत्था गाजीपूर बॉर्डरवरून आयटीओला पोहोचला होता. हा जत्था लाल किल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. अक्षरधाम-नोएडा मार्गावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना आऊटर रिंगरोडवरून जाण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या मार्गाने न जाता आंदोलकांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान शेतकऱ्यांमधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. ही दगडफेक सुरू होताच पोलिसांनीही शेतकऱ्यांवर लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडल्या. शेतकऱ्यांनी काही वाहनांची तोडफोडही केली. परिणामी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करावा लागला.
येथील मुकरबा चौकातही परिस्थिती नियमंत्रणाबाहेर गेली आहे. टिकी बॉर्डरवर नांगलोई येथे पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडण्यात आल्या आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या नियमांचा शेतकऱ्यांनी भंग केला आहे. दिल्लीत वेगवेगळ्या भागात निघालेल्या या ट्रॅक्टर रॅलीतील संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना अनेक ठिकाणी बळाचा वापर करावा लागला आहे. त्यामुळे या परिसरातील वातावरण अधिकच तापलं आहे.
#WATCH Violence continues at ITO in central Delhi, tractors being driven by protestors deliberately try to run over police personnel pic.twitter.com/xKIrqANFP4
— ANI (@ANI) January 26, 2021
आधीच रॅलीला सुरुवात
शेतकऱ्यांना 12 वाजता रॅली काढण्याची परवानगी देण्यात आलेली होती. पण त्याआधीच शेतकऱ्यांनी रॅलीला सुरुवात केली. ही रॅली रोखण्यात पोलिसांना अपयश आले. एवढेच नव्हे तर आंदोलक शेतकरी शेतकरी नेत्यांचंही काहीही ऐकत नसल्याचं चित्रं आहे.
रॅलीला परवानगी कशी मिळाली?
ट्रॅक्टर रॅलीला दिल्ली पोलिसांचा नकार होता. त्यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टातही धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलिसांना याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे अखेर दिल्ली पोलिसांना याबाबत निर्णय घेण्यास भाग पडावं लागलं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दिल्ली पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात बैठकीचं सत्र सुरु झालं. दिल्ली पोलिसांचं मुख्यालयपासून विज्ञान भवनपर्यंत या बैठाकांचं सत्र सुरुच राहीलं
शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीच्या प्रस्तावाला फेटाळून लावण्यासाठी दिल्ली पोलिसांनी साम-दाम-दंड-भेद सर्व प्रकार अवलंबली. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. शेतकरी आपल्या भूमिकेवरुन मागे हटत नाही हे लक्षात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी थोडी नरमाईची भूमिका घेतली. पोलिसांनी काही अटी-शर्ती ठेवून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅलीसाठी मंजुरी दिली.
दिल्ली पोलिसांच्या अटी-शर्ती नेमक्या काय होत्या?
दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना काही अटीशर्तींच्या आधारावर ट्रॅक्टर रॅलीस परवानगी दिली. मात्र,सर्व अटी धुडकावत शेतकरी लाल किल्लायवर धडकले. यावेळी अनेकांच्या हातात तलवारी देखील बघायला मिळाल्या.
“आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही रॅली काढा. मात्र सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला आमच्या काही गोष्टी ऐकाव्या लागतील. तुम्ही दिल्लीच्या प्रवेशद्वारात प्रवेश करु शकता. मात्र, रॅलीत सहभागी झालेला एकही शेतकरी दिल्लीच्या रींग रोडवर जाणार नाही. याशिवाय रॅलीत सहभागी झालेल्या कुणाच्याही जवळ काठी, हत्यार राहणार नाही. जर तसं आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. या कारवाईला कोणताच शेतकरी नेता विरोध करणार नाही”, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
त्याचबरोबर कोणत्याही ट्रॅक्टरला ट्रॉली राहणार नाही. कारण त्यामुळे रस्त्याची जागा कमी पडेल, अशी अट पोलिसांनी ठेवली. दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दिल्लीत कलम 144 लागू करण्यात येणार आहे. मात्र, शेतकऱ्यांची ज्या भागात रॅली निघणार नाही त्या भागात कलम 144 म्हणजे जमावबंदी असणार नाही, असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
संबंधित बातमी :
पोलिसांची व्हॅन, क्रेनवर आंदोलकांचा ताबा, मेट्रो बंद, शेतकरी आंदोलनाने तणाव; दिल्लीला छावणीचं स्वरुप
दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान पोलीस-शेतकरी भिडले, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज