Puja Khedkar Case: माजी प्रोबेशनरी IAS पूजा खेडकर हिला दिल्ली उच्च न्यायालयात झटका बसला आहे. पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तिच्या अटकेला स्थगिती देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे तिला कधीही अटक होऊ शकते. न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांच्या पीठाने म्हटले की, पूजा खेडकर हिने षडयंत्र रचून देशाच्या प्रतिमेला धक्का दिला आहे.
न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह म्हणाले की, प्रथमदर्शनी पूजा खेडकरविरुद्ध पुरावे दिसत आहे. पूजा खेडकर हिची कृती ही यूपीएससीच्या व्यवस्थेत फेरफार करण्याच्या मोठ्या कटाचा भाग आहे. तिला अटकपूर्व जामीन दिल्यास तपासावर परिणाम होईल, असेही दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यूपीएससी ही जगातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक आहे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पूजा खेडकर हिने फक्त संवैधानिक संस्थांची नाही तर संपूर्ण देशाची फसवणूक केली आहे.
न्यायमूर्ती सिंह म्हणाले की, पूजा खेडकर हिच्या विरोधात प्रथमदर्शनी भक्कम खटला तयार होत आहे. हे घटनात्मक संस्था तसेच समाजाची फसवणूक करणारे प्रकरण आहे. पूजा खेडकर आरक्षणाच्या लाभ मिळवण्यासाठी यूपीएससी परीक्षा 2022 मध्ये चुकीची माहिती दिली होती.
पूजा खेडकर ही पुण्यात प्रबोशनरी आयएएस म्हणून आली. पुण्यात येताच तिने कॅबिन आणि गाडीची मागणी केली. तसेच तिच्या खासगी गाडीवर बेकायदा अंबर दिवा लावला. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पूजा खेडकर हिची एक एक प्रकरणे समोर येऊ लागले. पुण्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारींनी तिच्याविरोधात अहवाल दिला. तसेच पूजा खेडकर हिने वेगवेगळ्या नावाने यूपीएससीची १२ वेळा परीक्षा दिली. यूपीएससीमध्ये फक्त नऊ संधी असतात. तसेच पूजा खेडकर हिने स्वत:चे नाव नाही तर वडिलांचे नावसुद्धा बदलले. तिचे वडील आयएएस असताना क्रिम लेअरचा लाभ घेतला. तिने अपंगत्वाचा खोटा दाखला मिळवला, असे अनेक प्रकार तिचे समोर आले.