नवी दिल्ली | 2 फेब्रुवारी 2024 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रांच आज संध्याकाळच्या वेळी दाखल झाली. या टीमसोबत एसपी सुद्धा होते. पोलिसांची टीम आमदारांच्या खरेदीच्या आरोपांप्रकरणी तपास करत आहे. याच आरोपांप्रकरणी पोलीस केजरीवाल यांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या निवसास्थानी आले होते. विशेष म्हणजे क्राईम ब्रांचने याप्रकरणी तपासासाठी काही आमदारांसोबतही संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणी सध्या सखोल तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.
आम आदमी पक्षाने विरोधकांवर आमदारांच्या खरेदीचे आरोप केले होते. आमदारांना आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी कोट्यवधी रुपये देवून वळवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांच्याकडून करण्यात आला आहे. याच आरोपांप्रकरणी क्राईम ब्रांचची टीम नोटीस घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती. पण केजरीवाल त्यावेळी घरी नसल्यामुळे पोलिसांची त्यांच्यासोबत भेट होऊ शकली नाही. त्यामुळे पोलीस नोटीस न देताच माघारी परतले. विशेष म्हणजे पोलीस आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांच्या घरी देखील नोटीस देण्यासाठी गेले. पण तिथेदेखील त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे पोलीस तिथूनही नोटीस घेऊन परत गेले.
आम आदमी पक्षाकडून विरोधी पक्षांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. पक्षाकडून सांगण्यात आलं होतं की, आम आदमी पक्षाच्या विरोधात एक कट रचला जात आहे. विरोधी पक्ष आमचे 21 आमदार विकत घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी तसा प्लॅन आखला आहे. इतकंच नाही तर त्यांनी 7 आमदारांसोबत संपर्कही केला आहे. त्यानी सांगितलं होतं की, आमदारांना प्रत्येकी 25 कोटी रुपये देण्यात येतील. त्या मोबदल्यात सरकार पाडण्यात येणार होतं, असा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला होता.
आम आदमीच्या वतीने आतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित दावा केला होता. विशेष म्हणजे वेळ येईल तेव्हा सर्व आरोपींचे ऑडिओ क्लिप जारी केल्या जातील, असंही आतिशी म्हणाल्या. आम आदमीच्या या आरोपांना भाजपकडून चॅलेंज देण्यात आलं आहे की, ज्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला त्यांची नावे जाहीर करा. भाजपचे दिल्ली सचिव हरीश खुराना यांनी हे चॅलेंज दिलं आहे. या प्रकरणी आता पोलीस तपास करत आहेत.