नवी दिल्ली : देशातील महिला आणि मुली कितपत सुरक्षित आहेत? असा प्रश्न वारंवार समोर येतो. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रत्येक राज्यात आणि केंद्रात महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. महिला आयोगाला प्रत्येक राज्यात विशेष अधिकार आहेत. देशातील पीडित महिलांना महिला आयोगाकडून (Women’s Commission) न्याय मिळेल, अशी आशा बाळगली जाते. अर्थात महिला आयोग योग्यवेळी धावून देखील जातं. असं असताना दिल्लीतून (Delhi) एक खूप मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी आपल्या जन्मदात्या पित्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
“मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं. ते मला मारहाण करायचे. त्यामुळे मी घाबरुन अंथरुणाच्या खाली लपून जायची. ते घरी यायचे तेव्हा मला खूप भीती वाटायची. मी तेव्हा खूप लहान होती. मी अंथरुणाच्या खाली लपून जायची आणि रात्रभर विचार करायची की, महिलांना कशाप्रकारे न्याय मिळवून द्यायला हवा. मी मुली आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवेन, असा त्यावेळीच मी निश्चय केलेला”, असं स्वाती म्हणाल्या.
“खरंतर ही घटना तेव्हाची आहे ज्यावेळी मी खूप लहान होती. अगदी मी इयत्ता चौथीत शिकत असेन. मी तोपर्यंत माझ्या वडिलांसोबत राहायची. त्यामुळे तोपर्यंत असं बऱ्याचदा घडलं”, असं स्वाती मालीवाल यांनी म्हटलं.
#WATCH | “I was sexually assaulted by my father when I was a child. He used to beat me up, I used to hide under the bed,” DCW chief Swati Maliwal expresses her ordeal alleging her father sexually assaulted her during childhood pic.twitter.com/GsUqKDh2w8
— ANI (@ANI) March 11, 2023
“मला अजूनही आठवतं की, जेव्हा ते माझ्याजवळ यायचे आणि माझ्या केसांची वेणी पकडून भींतीवर डोकं आपटायचे. त्यामुळे मला जखम व्हायची, त्या जखमेतून रक्त वाहायचं. जीव खूप विव्हळत असायचा. पण माझं एक मत आहे, जेव्हा माणूस पराकोटीचा अत्याचार सहन करतो तेव्हा दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाची आणि दु:खाची त्याला जाणीव होते. त्यामुळेच माणसाच्या मनात अशा प्रकारची आग जागृत होते, ज्यामळे संपूर्ण यंत्रणेत हल्लकल्लोळ माजतो. कदाचित माझ्यासोबत तेच घडलं आणि आपले जेवढे पुरस्कारप्राप्ती आहेत त्यांचीदेखील अशीच कहाणी आहे”, असं स्वाती मालीवाल म्हणाल्या.