अहमदाबाद | 10 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2016मध्ये केनियाला आले होते. विकासकामांच्या निमित्ताने त्यांचा दौरा होता. त्यावेळी त्यांनी आम्ही रेव्हेटेक्स मिलबाबत केलेल्या कामाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर आमचे आणि भारताचे सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध निर्माण झाले, असं सांगतानाच गुजराती समुदायात ट्रिपल सी असतो असं मला यापूर्वी वाटायचं. संस्कृती, व्यापार आणि दान हे ते तीन सी. पण आता त्यात आणखी एक सी आलाय. तो म्हणजे कनेक्शन. हे चारही सी गुजराती लोकांमध्ये पाहायला मिळत आहेत, असं केनियातील भारताचे उप उच्चायुक्त रोहित वाधवान यांनी सांगितलं.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये प्रवासी गुजरात पर्व 2024चं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात केनियातील भारताचे उप उच्चायुक्त रोहित वाधवान यांनी भाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी युके आणि आणि युगांडातील मान्यवरांनी संवाद साधला. यूकेच्या वेगवेगळ्या शहरातील महापौर हितेश टेलरस रामजी चौहान, डॉ. भरत पहाडिया आणि युगांडाचे माजी खासदार संजय तन्ना उपस्थित होते. यावेळी वाधवान यांनी वसुधैव कुटुंबकमच्या संकल्पनेवर जोर दिला. तसेच भारतीय आणि गुजराती संस्कृतीचा जगात कसा आदर केला जातोय, त्याची माहितीही दिली.
अहमदाबादमध्ये प्रवासी गुजराती पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे. विदेशात राहणाऱ्या यशस्वी गुजरातींचा संघर्ष आणि गाथा लोकांसमोर मांडणं हा त्यामागचा हेतू आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दीप प्रज्ज्वलित करून गुजरात पर्वाच्या दुसऱ्या एडिशनचं उद्घाटन केलं. टीव्ही9 नेटवर्क आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन्स इन नॉर्थ अमेरिकाने या सोहळ्याचं आयोजन केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरातमधील विकासकामांवर प्रकाश टाकला. तसेच गुजरातमध्ये जे काही होतं, ते वर्ल्ड क्लास असतं, असंही त्यांनी सांगितलं. तसेच मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
प्रवासी गुजराती पर्वाच्या सुरुवातीला सर्वात आधी एआयएनएचे अध्यक्ष सुनील नायक यांनी आपले विचार मांडले. कोरोना आणि संकटाच्या काळात अनिवासी गुजरातींनी मोठी साथ दिली. गुजराती संस्कृती जगाला हेवा वाटावी अशी आहे. गुजराती गरबा, मंदिर आणि भोजन आता वैश्विक झाले आहे, असं नायक म्हणाले. टीव्ही9 गुजराती चॅनलचे हेड कल्पक केकरे यांनीही कार्यक्रमाला संबोधित केलं. तर टीव्ही9 नेटवर्कचे चीफ ग्रोथ ऑफिसर रक्तिम दास यांनी फिजीचे उपपंतप्रधान बिमान प्रसाद सहीत इतर मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, यूएसए मिसौरी राज्याचे कोषाध्यक्ष विवेक मालेक, हिंदू धर्म आचार्य सभेचे संयोजक परमात्मानंद आदी मान्यवर उपस्थित होते.