जलवायु कार्यकर्ता सोनम वांगचुक आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेण्याच्या निर्णयावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. सिंघू बॉर्डरवर सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे अजिबात स्वीकार्य नाही, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदी जी, तुमचा अंहकार मोडून पडेल असं राहुल गांधी म्हणाले. “पर्यावरण आणि संवैधानिक अधिकारांसाठी शांततापूर्ण मार्च काढणाऱ्या सोनम वांगचुक आणि शेकडो लडाखवासियांना अशा प्रकारे ताब्यात घेणं मान्य नाही” असं राहुल गांधी एक्स वरील पोस्टमध्ये म्हणाले आहेत. राहुल गांधी यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरलं.
लडाखच्या भविष्यासाठी उभा राहणाऱ्या वृद्धांना दिल्लीच्या सीमेवर का ताब्यात घेत आहात? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे. तुम्हाला लडाखचा आवाज ऐकावा लागेल. सोनम वांगचुक आणि त्यांच्या समर्थकांना दिल्ली पोलिसांनी सोमवार रात्री उशिरा ताब्यात घेतलं. दिल्लीच्या सीमेवर बीएनएस कलम 163 लावण्यात आलं आहे अशी घोषणा दिल्ली पोलिसांनी केली.
सोनम वांगचुक काय म्हणाले?
वांगचुक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर आपल्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली. “मला आणि माझ्या 150 सहकाऱ्यांना दिल्लीच्या बॉर्डरवर दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अटक केलेल्यांमध्ये पुरुष, महिला आणि काही माजी सैनिक आहेत. आमचं काय होणार, हे आम्हाला माहित नाही. आम्ही शांततेत बापूंच्या समाधीस्थळी चाललो होतो” असं सोनम वांगचुक म्हणाले.
कधी पायी चालत निघालेले?
लडाखच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वांगचुक आणि त्यांचे सहकारी लेह ते नवीन दिल्ली पायी चालत आले आहेत. लडाखचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मुख्य मागणी आहे. 1 सप्टेंबरपासून त्यांनी लेहपासून ही पदयात्रा सुरु केली होती. 14 सप्टेंबरला हिमाचल प्रदेशला पोहोचल्यानंतर ते म्हणाले की, “आम्ही सरकारला पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देण्याच्या मिशनवर आहोत”