नवी दिल्ली | 9 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत आज सुशासन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने दिल्लीत सुशासन महोत्सवाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सुशासनाचं महत्त्व पटवून दिलं. “हे सेलिब्रेशन यासाठी आहे की, देशात आज सुशासन पर्व सुरु आहे. या सुशासन पर्वला एका महोत्सवाच्या रुपाच जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनाचं एक असं वातावरण तयार केलं आहे, मग ते देशाचं सरकार असो किंवा राज्याचं सरकार असो, सुशासनचे वेगवेगळे मॉडेल आपल्याला बघायला मिळतात, या मॉडेल्स सर्वांना माहिती व्हावं यासाठी सुशासन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“सुशासन आपल्या देशात अनेक काळापासून आहे. अयोध्या कांड पाहिलं तर तिथे सुशासन बघायला मिळतं. महाभारतात सुशासनाचं उदाहरण अनुशासन पर्वात बघायला मिळतं. एवढंच नाही, मौर्य काळ असेल, किंवा आचार्य चाणक्य यांनी लिहिलेली सर्व नीती, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सुशासन बघायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात सुशासनाचं असं मॉडेल आपल्याला बघायला मिळतं की, जो समाजाचा अंतिम व्यक्ती आहे त्याची चिंता केली जाते”, असं फडणवीस म्हणाले.
“याच सुशासनला एकप्रकारे आपल्या आधुनिक भारतात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या लोकशाहीत आणलं. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रकारे देशाला सुशासनाच्या आधारावर बदललं, देशात 25 कोटी लोकांना द्रारिद्र्य रेषेतून बाहेर काढलं. भारत एक महाशक्तीच्या रुपात बदलत आहे, त्याचं एक कारण सुशासन आहे. त्याचं मॉडेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलं आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“चांगलं सुशासन म्हणजे काय? सुशासन हे ऑक्सिजनसारखं असतं. सुशासनमुळे आपलं जेवण चांगल्याप्रकारे चालतं. ते दिसत नाही. त्यामुळे आम्ही महोत्सवाच्या माध्यमातून अनुभती देतो. आम्ही देशात 2004 पासून 2013 पर्यंत देशात कुसुशासन बघितलं किंवा सुशासनचा अभाव बघितला, आपली संस्था कशा मृतावस्थेत जातात ते पाहिलं. पण आता हे सुशासन पर्व चालू झालंय. आपण सर्व देशभरात पुढे नेण्याचा प्रयत्न करु”, असा निश्चय देवेंद्र फडणवीस यांनी केला.