गिधाडांचं चामडं पांघरून… काय म्हणता ! साईबाबा देव नाही?; बागेश्वर बाबांचा साईबाबांना देव मानण्यास नकार

| Updated on: Apr 02, 2023 | 8:12 AM

बागेश्वर बाबाने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. साईबाबा संत होऊ शकतात. फकिर होऊ शकतात. ते देव होऊ शकत नाही, असं बागेश्वर बाबांनी म्हटलं आहे. जबलपूर येथे ते बोलत होते.

गिधाडांचं चामडं पांघरून... काय म्हणता ! साईबाबा देव नाही?; बागेश्वर बाबांचा साईबाबांना देव मानण्यास नकार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जबलपूर : नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी आता पुन्हा नव्या विधानाने वादग्रस्त ठरले आहेत. बागेश्वर बाबा यांनी थेट साईबाबा यांनाच देव मानण्यास नकार दिला आहे. मी कुणाची भावना दुखावत नाही. पण एवढे सांगतो. साईबाबा संत होऊ शकतात, फकीर होऊ शकतात. पण देव होऊ शकत नाही, असं बागेश्वर बाबा यांनी स्पष्ट केलं. साईबाबांची पूजा केली पाहिजे की नाही? असा सवाल केला असता गिधाडाचं चामडं पांघरून कोणी सिंह होत नाही, असं विधानही बागेश्वर बाबा यांनी केलं आहे. त्यामुळे बागेश्वर बाबा वादात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

जबलपूर येथे बागेश्वर बाबांच्या श्रीमद्भगवत कथेचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी ते लोकांशी संवाद साधत होते. भक्तांच्या प्रश्नांना उत्तरही देत होते. यावेळी त्यांना साईबाबांविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी आपलं म्हणणं खरं असल्याचं सांगण्यासाठी शंकराचार्यांचा दाखलाही दिला. आपल्या शंकराचार्यांनी साई बाबांना देवाचं स्थान दिलं नाही. शंकराचार्यांचं म्हणणं ऐकणं हे बंधनकारक आहे. प्रत्येक सनातनी धर्माने शंकराचार्यांचं ऐकलं पाहिजे. कारम शंकराचार्य हे धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणताही संत असेल, मग तो आपल्या धर्माचा का असेना, तो देव होऊ शकत नाही, असं बागेश्वर बाबा म्हणाले.

हे सुद्धा वाचा

महापुरुष आणि संत

कोणताही संत असू द्या, मग गोस्वामी तुलसीदास असो, सूरदास असो हे सर्व संत आहेत. काही महापुरुष आहेत. काही युग पुरुष आहेत. काही कल्प पुरुष आहेत. परंतु यात कोणही देव नाही. आम्ही कुणाच्याच भावनेला ठेस पोचवत नाहीये. पण साईबाबा संत होऊ शकतात. फकिर होऊ शकतात. ते देव होऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. काही लोक माझं मत हे वादग्रस्त ठरवतील. पण सत्य बोलण्याची गरज आहे. कारण गिधाडांचं चामडं पांघरून कोणीही सिंह होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. बागेश्वर बाबांनी हे विधान करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

यापूर्वीही वादात

बागेश्वर बाबा नेहमी वादात असतात. यापूर्वी त्यांनी आपल्यातील असलेल्या अलौकिक शक्तीमुळे इतरांच्या मनातील ओळखता येते असा दावा केला होता. त्याला अंनिसने विरोध केला होता. आम्ही दहा माणसं देतो, त्यांच्या बाबतची माहिती द्या आणि 30 लाख रुपयांचं बक्षिस घेऊन जा, असं आव्हानच अंनिसने बागेश्वर बाबांना दिलं होतं. बागेश्वर बाबांनी हे आव्हान स्वीकारलं होतं. पण हा चमत्कार नागपूरला नाही तर जयपूरला करून दाखवेन, असा दावा त्यांनी केला होता.

शंकराचार्य काय म्हणाले होते?

दरम्यान, शंकराचार्य यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला होता. साईबाबांची पूजा करणं चुकीचं आहे. त्यांना देव मानणं चुकीचं आहे, असं शंकराचार्य म्हणाले होते. यावेळी त्यांनी साईबाबांच्या मंदिराच्या निर्मितीलाही विरोध केला होता.