संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्ताकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ राज्यातील सत्ता संघर्षावर महत्त्वाचा निकाल देणार आहे. आता ११ वाजता हा निकाल देण्यात येणार आहे. या निकालामुळे राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार राहणार की नाही? याचा फैसला होणार आहे. या शिवाय त्या 16 आमदारांची आमदारकी राहणार की जाणार? याचाही फैसला होणार आहे. परंतु या निकालासंदर्भात दिल्लीतील वकिलांनी मोठा दावा केला आहे.
काय म्हणतात वकील मंडळी
निकालसंदर्भात दिल्लीतील वकिलांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे. आता थोड्याच वेळात सत्ता संघर्षावर निकाल येणार आहे. या निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यासंदर्भात चर्चा होत आहे. दिल्लीतील वकिलांमध्येही निकालासंदर्भात चर्चा सुरु आहे. त्यानुसार निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागेल, असे मत दिल्लीतील वकिलांनी व्यक्त केले आहे. हा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना 40 वर्षांचा अनुभव आहे. घटनापीठ काय निर्णय देणार ? याकडे देशाचे लक्ष असताना दिल्लीतील वकील मंडळींमध्येही निकालाबद्दल कुतूहल आहे.
काय होतं प्रकरण?
जून 2022मध्ये शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार सुरतला गेले. सुरतवरुन गुवाहाटीला गेले. विधिमंडळ पक्षनेत्याच्या बैठकीलाही हे १३ आमदार उपस्थित राहिले नाही.
सुरु केली अपात्रतेची कारवाई
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पार्टीचा मुख्य प्रतोद नियुक्त केला. त्याने तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांद्वारा बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली. तसेच त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई सुरू केली.
त्याचवेळी बंडखोर आमदारांनी उपाध्यक्षांविरोधात अविश्वासाची नोटीस बजावली. मात्र, योग्य कार्यवाहीनुसार ही नोटीस आली नसल्याचं सांगून ती फेटाळून लावण्यात आली.
या 16 आमदारांवर टांगती तलवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (आमदार, कोपरी-पांचपाखाडी)
तानाजी सावंत (आमदार, भूम परंडा)
अब्दुल सत्तार (आमदार, सिल्लोड)
यामिनी जाधव (आमदार, भायखळा)
संदीपान भुमरे (आमदार, पैठण)
भरत गोगावले (आमदार, महाड)
संजय शिरसाठ (आमदार, छत्रपती संभाजीनगर पश्चिम)
लता सोनावणे (आमदार, चोपडा)
प्रकाश सुर्वे (आमदार, मागाठाणे)
बालाजी किणीकर (आमदार, अंबरनाथ)
बालाजी कल्याणकर (आमदार, नांदेड उत्तर)
अनिल बाबर (आमदार, खानापूर)
संजय रायमूलकर (आमदार, मेहेकर)
रमेश बोरनारे (आमदार, वैजापूर)
चिमणराव पाटील (आमदार, एरोंडोल)
महेश शिंदे (आमदार, कोरेगाव)