नवी दिल्ली : लडाख, पँगागचा तलाव आणि गलवाननंतर चिनी सैनिक पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत. अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागात घुसखोरीचा डाव चीनवरच उलटलाय. भारतीय सैन्यांच्या प्रतिकारामुळे तब्बल 300 चिनी सैनिकांना त्यांच्या मूळ हद्दीत परतावं लागलंय. भारत आणि चिनी सैनिकांमध्ये जी हाणामारी झाली, ती अरुणाचल्या तवांग भागात घडली. भूतान देशाच्या सीमेला लागून भारताच्या अरुणाचलमध्ये तवांग नावाचा भाग आहे. याच भागात दोन्हीकडचं सैन्य-आमने सामने आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 300 चिनी सैनिक तयारीनिशी पोहोचले होते. त्यांच्या हातात बंदूक वगळता इतर शस्रं होती. भारतीय सैन्याचा विरोध झुगारुन अरुणाचलच्या हद्दीत शिरण्याचा चिन्यांचा मनसुबा होता.
मात्र भारतीय सैनिकांनी त्याला जोरदार प्रतिकार केला. ज्यामुळे चिनी सैनिकांना मागे जावं लागलं. झटापटीत अनेक चिनी सैनिक जखमी झाले आहेत. तर भारतीय सैन्यातल्या 6 जवान यात किरकोळ जखमी झाले असून त्यांना गुवाहाटीच्या रुग्णालयात भर्ती करण्यात आलंय.
चीननं पुन्हा आगळीक केल्यास खबरदारी म्हणून भारतीय वायुदलाचे सुखोई थर्टी विमानं तैनात झाली आहेत. एल 70 यंत्रणा अलर्टवर आहे. आणि s-400 मिसाईल यंत्रणेलाही सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अरुणाचलच्या तवांग भागात चिनी सैन्यांचा डोळा अनेक वर्षांपासून आहे. तवांगमधल्या यांग्त्से भागात भारत-चीन सैन्य याआधी सुद्दा अनेकदा आमने-सामने आलंय. ऑक्टोबर 2021 मध्येही अशीच झटापट झाली होती.
चीनचा तवांग भागावर डोळा का आहे?
अरुणाचलमधल्या तवांग भागातल्या यांग्त्से भागात 17 हजार फुटांचा एक पर्वत आहे. रणनितीक पातळीवर हा पर्वत प्रचंड महत्वाचा आहे.
इथं कब्जा केल्यास चीनची सीमा आणि भारतीय सीमा या दोघांवर नियंत्रण ठेवणं सोपं जाणार आहे. म्हणून चिनी वारंवार या भागात घुसखोरीचा प्रयत्न करतात.
मात्र आतापर्यंत चीनचे सर्व मनसुबे भारतीय सैन्यानं उधळून लावले आहेत.
भारत आणि चीनदरम्यानची सीमारेषा जवळपास 3 हजार 440 किलोमीटर लांब आहे. जी अरुणाचल प्रदेशपासून सुरु होऊन पुढे सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरच्या लडाख भागापर्यंत येते.
1996 च्या युद्धानंतर अनेक भागांमध्ये सीमेवरुन वाद आहेत. तवांग भागातली सीमारेषा सुद्धा चीन अमान्य करतो.
दरम्यान तवांग सीमेवरचा सारा प्रकार ९ डिसेंबरला घडला होता. मात्र याची माहिती केंद्र सरकारनं इतक्या उशिरा का दिली? यावरुन विरोधक आक्रमक झाले. त्यावर सरकारनंही उत्तर दिलं.
याआधी 1 मे 2020 ला लडाखच्या पँगाँग तलावावरुन भारत-चीन सैन्यात झटापट झाली. यात दोन्हीकडचे सैन्य जखमी झालं.
15 जून 2021 ला गलवान घाटीत पुन्हा वाद झाला. भारताचे 20 तर चीनचे 38 हून जास्त सैनिक मारले गेले.
पुढे चर्चेअंती दोन्हीकडचं सैन्य माघारी फिरलं. मात्र अजूनही या मुद्दयावर चर्चा सुरुय.