नवी दिल्ली | 8 ऑगस्ट 2023 : लोकसभेतील चर्चा ही मणिपूरवरुन मोदी सरकार विरोधात आलेल्या अविश्वास ठरावावर होती. पण खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आणि टीका टिप्पणी गद्दारी आणि भगोडे म्हणण्यापर्यंत पोहोचली. ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांनी श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अरविंद सावंतांनी थेट औकात दाखवण्याचाच इशारा दिला.
अविश्वास ठरावावर, चर्चेची सुरुवात काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या भाषणानं होणार होती. पण राहुल गांधींऐवजी काँग्रेसकडून गौरव गोगोई बोलायला उभे राहिले आणि संसदीय मंत्री प्रल्हाद जोशींनी राहुल गांधींना डिवचलं. त्यानंतर अध्यक्षांच्या कार्यालयात पंतप्रधान मोदींसमोर काय बोलणं झालं, हे सांगू का? असं वक्तव्य करताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भडकले. काँग्रेसकडून गौरव गोगोईंनी पंतप्रधान मोदींना घेरलं. पंतप्रधान मोदींना 3 सवाल करतानाच, मोदी 3 महिने मौन का? असा हल्लाबोल गोगोईंनी केला.
चर्चेदरम्यान भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि सुप्रिया सुळे आमनेसामने आल्यात. राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे गुन्हे काँग्रेसनं दाखल केले. 1980 मध्ये पवारांचं सरकार काँग्रेसनं पाडलं, मग आमच्यासोबत काय दुश्मनी? असा सवाल दुबेंनी केला. त्या टीकेला सुप्रिया सुळेंनीही प्रत्युत्तर दिलंय. गेल्या 9 वर्षांत मोदी सरकारनं 9 राज्य सरकार पाडल्याचा आरोप सुळेंनी केलाय. तर महागाईवरुनही सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारला चांगलंच घेरलं.
पुन्हा खासदारकी बहाल झाल्यानंतर अविश्वास प्रस्तावावरुन राहुल गांधी बोलतील असं वाटत होतं. मात्र ते काही बोलले नाहीत. मात्र भाजपच्या निशिकांत दुबेंनी सोनिया गांधी, राहुल गांधींना चिमटा काढणं काही सोडलं नाही. अविश्वास प्रस्तावावर आणखी 2 दिवस चर्चा होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक पुढचे 2 दिवस आमनेसामने येतील.