चंदिगड : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या मनात रोष वाढतच चालला आहे. याच रोषातून आज हरियाणाच्या यमुनानगरमध्ये आंदोलक शेतकरी आणि पोलीस आमनेसामने आले. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच ट्रॅक्टरने बॅरिकेट्स तोडले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी सध्या परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच मोठा फौजफाटादेखील तैनात करण्यात आला आहे (Dispute between protester farmers and police in Yamunanagar Haryana).
हरियाणाच्या यमुनागरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भाजपकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला हरियाणाचे परिवहन मंत्री मूलचंद शर्मा देखील येणार होते. तसेच भाजप नेते कंवर पाल गुर्जर आणि रतनलाल कटारिया यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते बैठकीला हजर राहणार होते. या बैठकीबाबत आंदोलक शेतकऱ्यांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांच्या संतापाचा पारा चढला. शेतकऱ्यांनी संबंधित बैठक उधळून लावावी किंवा रद्द व्हावी यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली (Dispute between protester farmers and police in Yamunanagar Haryana).
#WATCH | A group of farmers in Haryana’s Yamunanagar jump over the police barricading while protesting against State Cabinet Minister Mool Chand Sharma regarding new farm laws pic.twitter.com/DoTTi8zurx
— ANI (@ANI) July 10, 2021
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर गेल्या आठ महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. या आठ महिन्यांच्या कालखंडात शेतकरी आंदोलनात बरेच चढउतार आले. मात्र, अद्यापही या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना येत्या 22 तारखेपासून दिल्लीत आंदोलनासाठी जाणार अशी माहिती दिली आहे. येत्या 22 तारखेपासून संसदचं सत्र सुरु होणार आहे. त्यामुळे आमचे 200 आंदोलक संसद जवळ आंदोलन करतील, असं राकेश टिकैत यांनी सांगितलं आहे.
दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डरवर शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याची घटना दहा दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यावेळी आंदोलक शेतकऱ्यांच्या मंचावर भाजप नेते आल्याने संबंधित गदारोळ झाला होता, अशी माहिती समोर आली होती. संबंधित घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आंदोलक शेतकरी आणि भाजप कार्यकर्ते यांच्या तुफान हाणामारी झाली होती. त्यावेळी अनेकांच्या हातात लाठ्या-काठ्या दिसल्या होत्या. या हाणामारीत काही आंदोलक जखमी देखील झाले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे संबंधित घटना निवळली होती.
संबंधित बातमी : दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डरवर शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट, मोठा गदारोळ