लखनौ – लखनौत (Lukcnow)नुकताच सुरु झालेला लुलु मॉल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मॉलमध्ये नमाज (Namaz)पठण करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर नवा वाद सुरु झाला आहे. बुधवारी हा व्हिडीओ समोर आल्यानंतर, अखिल भारतीय हिंदू महासभेने या मॉलच्या प्रशासनाला इशारा दिला होता. जर मॉलमध्ये पुन्हा नमाज पठण झाल्याचे दिसले तर हिंदू महासभा (Hindu Mahasabha)मॉलमध्ये सुंदरकांडाचे पठण करेल. नागरिकांनी या मॉलवर बहिष्कार घालावा आणि इथून सामान विकत घएू नये असे आवाहनही हिंदू महासभेने केले होते. वाद वाढल्याचे लक्षात आल्यानंतर मॉलचे जनरल मॅनेजर, ऑपरेशन्स समीर वर्मा यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. या नमाज प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही फूटेजमध्ये हे नमाज पढणारे कोण होते यांचा शोध घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. तपास करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले. पुन्हा मॉलमध्ये असा प्रकार घडणार नाही, याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
या मुद्द्याचं आता उ. प्रदेशात राजकारण होऊ लागलं आहे. नमाजावर आक्षेप घेणाऱ्यांवर समाजवादी पार्टीने टीका केली आहे. हा देशातील सर्वात मोठा मॉल असून, तो एका मुस्लीम व्यावसायिकाने लखनौत उभा केला आहे. तिथे जर नमाज पठण करण्यात आले, तर त्यात काय गुन्हा आहे, असा सवाल सपाचे नेते आय पी सिंह यांनी केला आहे. काही मूठभर नागरिकांना याचा का राग येतोय, असेही त्यांनी विचारले आहे.
लखनौतील सगळ्यात मोठा मॉल असलेल्या या लुलु मॉलचे उद्घाटन 11 जुलै रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले होते. सध्या तिथे दररोज एक लाख नागरिक येत आहेत. लुलु ग्रुपचे एमडी एमए युसुफ अली हे आहेत. या ग्रुपचा कारभार अरब देशात, विशेष करुन दुबईत आहे. त्यांचे मुख्य कार्यालय अबुधाबीत आहे. शुक्रवारी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर एक व्हिडीो पोस्ट करण्यात आला, त्यात मॉलमध्ये काही जण नमाज पठण करत असल्याचे दिसत आहेत. त्यानंतर हा वाद सुरु झाला. मॉलमध्ये धार्मिक कार्यक्रम कशासाठी असा प्रश्न हिंदू संघटना विचारीत आहेत.
अयोध्येच्या हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी या मॉलमध्ये हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे सांगितले आहे. तिथे आम्हाला कुणीही अडवू शकणार नाही, असेही ते म्हणाले आहे. हा आशियातील सर्वात मोठा मॉल आहे. तिथे ८० टक्के मुसलमानांना नोकऱ्या दिल्या आहेत आणि २० टक्के हिंदू मुलींना नोकरी दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. एकही मुस्लीम मुलगी तिथे नोकरीला नाही, असे सांगत यात अजून विरोधाला अनेक पदर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.