नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात एक वेगळीच याचिका दाखल करण्यात आली. युट्यूबवर अश्लील याचिका पाहून अभ्यासातून मन उडाल्याचा दावा एका तरुणाने केला. त्यामुळे आपल्याला युट्यूबने भरपाई देण्याची मागणीही या तरुणाने केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली. नुसतीच फेटाळून लावली नाही तर त्याला फटकारतानाच त्याला 25 हजारांचा दंडही ठोठावला.
जस्टिस संजय किशन कौल यांच्या बेंच समोर ही याचिका ठेवण्यात आली होती. मध्यप्रदेशातील रहिवासी आनंद किशोर चौधरी असं या याचिकाकर्त्याचं नाव आहे. यावेळी जस्टिस कौल यांनी या याचिकेवर अत्यंत कडक शब्दात याचिकाकर्त्याला फटकार लगावली. आतापर्यंतच्या याचिकांमधील ही सर्वात वाह्यात याचिका असल्याचं कौल यांनी म्हटलं. या याचिकेमुळे कोर्टाचा वेळ वाया गेला आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याला 25 हजाराचा दंड ठोठावण्यात येत असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.
याचिकाकर्त्याने जनहित याचिका दाखल केली होती. युट्यूबवर अश्लील जाहिराती येत असल्याने परीक्षेच्या काळात अभ्यासावरून मन उडाल्याचं या याचिकेत म्हटलं होतं. तसेच युट्यूबवर अश्लील सामुग्री दाखवल्याबद्दल गुगल इंडियाकडून 75 लाख रुपये भरपाई देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली होती.
युट्यूबवरील जाहिरात पाहिल्यानंतर परीक्षेवेळी अभ्यासातून मन उडालं आणि त्यामुळे परीक्षेत नापास व्हावं लागलं. त्यामुळेच त्याने कोर्टाकडे ही भरपाई मागितली होती. पण कोर्टाने याचिकेवर विचार करण्यासही नकार दिला. उलट याचिकाकर्त्याला 25 हजाराचा दंड ठोठावला.
या वाह्यात याचिकेने कोर्टाची वेळ वाया घालावली. ही वाह्यात याचिका आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. तसेच तुम्हाला जाहिरात आवडत नाही तर पाहू नका. तुम्ही जाहिरात का पाहिली? हा काय तुमचा विशेषाधिकार आहे?, अशा कडक शब्दात कोर्टाने याचिकाकर्त्याला बजावलं आहे.