कटक : ओडिशाच्या बालासोर येथे तीन ट्रेनचा विचित्र अपघात झाला. या अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1100 प्रवाशी गंभीर जखमी झाले. भरधाव वेगाने येणाऱ्या या तीन ट्रेनचा अपघात अत्यंत भीषण होता. त्यामुळे अनेकांच्या डोक्याला, पायाला जबर मार लागला. अनेक लोक या अपघातातून आता बरेही होत आहेत. मात्र, आता या अपघातातील काही प्रवाशांना मानसिक आजारांनी घेरलं आहे. अनेकजण वारंवार हसत आहेत. काही सारखं रडत आहेत. तर कोणी वारंवार ओरडतंय तर कोणी शांत बसून आहे. अशी विचित्र परिस्थिती या प्रवाशांची झाली असून या प्रवाशांवर युद्धपातळीवर उपचार केले जात आहे.
कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये 105 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. त्यातील काही रुग्ण ठणठणीत बरे जाले आहेत. तर 40 रुग्णांमध्ये पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी)ची लक्षणे दिसून आली आहेत. या सर्व रुग्णांवर समूपदेशन करण्यात येत आहे. कुटुंबातील लोकांच्या उपस्थित डॉक्टर रुग्णांच्या मनातील भीती दूर करण्याचं काम करत आहेत.
एका वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. क्लिनिकल सायकॉलॉजी विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. जशोबंता महापात्रा यांनी या वृत्तसंस्थेला या आजाराबाबतची माहिती दिली आहे. अपघातातील सर्व रुग्णांची मानसिक स्थिती पाहिली असता सर्व रुग्णांचे समुपदेशन सुरू करण्यात आलं आहे. या दुर्घटनेमुळे जिवंत राहिलेल्या लोकांच्या डोक्यावर गंभीर परिणाम झाला आहे. तसं होणं स्वाभाविक आहे, असं महापात्रा यांनी म्हटलं आहे.
काही रुग्ण प्रचंड तणावात दिसत आहेत. काही प्रचंड घाबरलेले आहेत. काही रुग्ण कधी कधी घाबरताना दिसत आहेत. काही जखमींवर इतका परिणाम झालाय की ते मौनात गेले आहेत. काहीही बोलण्यास तयार नाहीत. आम्ही अशा सर्वांचं समुपदेशन करत आहोत. आम्ही या रुग्णांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधत आहोत. रुग्णांशी कसं वागलं पाहिजे, त्यांची मनस्थिती काय आहे याची माहिती त्यांना देत आहोत, असं म्हात्रा यांनी या संस्थेला स्पष्ट केलं. या रुग्णांच्या समुपदेशनासाठी चार पथके तयार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
प्रत्येक टीममध्ये एक मानोसपोचार तज्ज्ञ, एक सामाजिक कार्यकर्ता आणि रुग्णाच्या कुटुंबातील एक किंवा दोन सदस्यांचा त्यात समावेश आहे. जे लोक या अपघातातून बचावले त्यांना नीट झोप येत नाहीये. झोपेत त्यांना अपघाताचं दृश्य दिसतंय. त्यामुळे ते झोपेतून दचकून उठत आहेत. रात्री असो वा दिवसा त्यांच्या डोळ्यासमोर अपघाताचं चित्र येत आहे. त्यामुळे काही रुग्णांना तर डोळे बंद करण्याचीही भीती वाटत आहे. वारंवार डोळ्यासमोर तेच ते दृश्य येत असल्याने त्यांना भीतीने ग्रासले आहे. आम्ही सर्व रुग्णांची काळजी घेत आहोत, असं एका नर्सने सांगितलं.
एका तरुणाने तर त्याचा मित्र या अपघातात गमावला आहे. तो झोपेत वारंवार आपल्या मित्राचं नाव घेत आहे. मित्राला हाका मारतच तो झोपेतून जागा होतो. तर काही रुग्ण केवळ भिंतीकडे एकटक पाहत आहेत. शांतपणे बसून आहेत. काही वारंवार रडत आहेत. काही हसत आहेत. तर काही किंचाळत आहेत, असं या नर्सने सांगितलं.