श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग गावात बुधवारी भीषण गोळीबार झाला. यात सैन्याचे कर्नल, मेजर आणि जम्मू-काश्मीर पोलिस दलातील डीएसपीसह तीन वरिष्ठ अधिकारी शहीद झाले. कोकेरनाग गावातील गोळीबारात डीएसपी हुमायूं भट शहीद झाले. त्यांचे वडिल गुलाम हसन भट जम्मू कश्मीर पोलीस दलातील सेवानिवृत्त महानिरीक्षक (IG) आहेत. ते 2018 मध्ये रिटायर झाले होते. हुमायूं भट यांना मुलगी आहे. ती अवघ्या एक महिन्याची आहे. 2018 बॅचचे ते अधिकारी होते. जम्मू-काश्मीर पोलीस दलातील हुशार, वेगाने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये हुमायूं भट यांचा समावेश व्हायचा. वर्षभरापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत ते जखमी झाले. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे हुमायूं भट यांचा मृत्यू झाला.
बुधवारी रात्री उशिरा गुलाम हसन भट यांनी आपल्या मुलाला हुमायूं भटला अंतिम सलामी दिली. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. हुमायूं भट यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहण्यात आलं. यावेळी उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि अन्य वरिष्ठ रँकचे अधिकारी उपस्थित होते. अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी चकमकीत शहीद झालेले हुमायूं यांचं दीडवर्षापूर्वी लग्न झालं होतं. अलीकडेच ते एका मुलीचे पिता बनले होते. महिन्याभरापूर्वी त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला होता. हुमायूं भट यांच्या मृत्यूमुळे त्यांचं सर्व कुटुंब दु:खात बुडून गेलं आहे. त्यांच्या घरी छोट्या परीच आगमन झालं होतं. हा आनंद साजरा होण्याआधीच बंदुकीच्या फैरीच्या आवाजाने हा आनंद दु:खात बदलला. दीड वर्षापूर्वीच हुमायूं भट यांचं लग्न झालं होतं.
एक जवान बेपत्ता
अनंतनागच्या कोकेरनाग गावात दहशतवादी आणि सुरक्षा पथकांमध्ये चकमक झाली. यात जम्मू काश्मीर पोलीस दलातील डीएसपी हुमायूं भट यांच्यासह 19 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशीष धोनैकही शहीद झाले. एक जवान बेपत्ता आहे. बुधवारी सकाळी अनंतनाग जिल्ह्यातील गारोल भागात दहशतवाद्यांशी चकमक सुरु असताना हे तीन अधिकारी गंभीररित्या जखमी झाले होते. उपचारादरम्यान या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.