चेन्नई : वेळ आली असेल, तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूला छोटसं कारणही पुरेस ठरतं. प्रवासातच नाही, तर एखाद्या मंगल प्रसंगातही दुर्देवी घटनेमुळे मृत्यू होतो. अशीच एक दुर्देवी घटना तामिळनाडूच्या कांचीपूरम जिल्ह्यात घडली. रविवारी संपूर्ण गाव मंदिराच्या उत्सवात व्यस्त होतं. सर्वत्र आनंद, उत्साह होता. त्याचवेळी सर्वांना सुन्न करुन सोडणारी ही घटना घडली.
एका 13 वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. संपूर्ण गाव हळहळलं. एका क्षणात उत्साह, आनंद दु:खामध्ये बदलला. असं घडेल याची कोणीही कल्पना केली नव्हती.
लावंण्या कितव्या इयत्तेत होती?
एस लावंण्या (13) असं मृत मुलीच नाव आहे. कांचीपूरम जिल्ह्याच्या विटचनथंगल गावामध्ये मनाला चटका लावणारी ही घटना घडली. लावण्या 7 व्या इयत्तेत होती. सरकारी शाळेत ती शिकत होती. लावण्या विटचनथंगल गावात आपल्या आजी-आजोबांकडे रहात होती.
रथ पुढच्याबाजूला होता
मंदिराचा उत्सव असल्याने रविवारी रात्री गावात मिरवणूक निघाली होती. यात्रेतला मुख्य रथ पुढच्याबाजूने काहीजण ओढत होते. मागे बैलगाडीवर जनरेटर ठेवलेला होता. या बैलगाडीवर लहान मुलं बसली होती.
कोणालाच तिचा आवाज ऐकू आला नाही
रात्री 10 च्या सुमारास लावंण्याचे केस जनरेटरच्या छोट्या पंख्यात अडकले. ती मदतीसाठी आरडाओरडा करत होती. पण लाऊड स्पीकरमुळे कोणालाच तिचा आवाज ऐकू आला नाही. जनरेटर अचानक बंद झाला, त्यावेळी सर्वांना तिचं किचाळणं ऐकू आलं.
नेमकं काय घडलं?
लगेचच तिला उपचारसाठी जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. नंतर कांचीपूरमच्या सरकारी रुग्णालायत हलवलं. जनरेटरमध्ये केस अडकल्याने लावंण्या मागच्या बाजूला खेचली गेली. तिच्या डोक्याला मार लागला. उपचारादरम्यान तिचं निधन झालं. मागाराल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केलाय. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय.