नवी दिल्ली : देशात एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळाता धोका आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याची भीती आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची धाकधूक वाढली आहे. हे चक्रीवादळ जसजसं किनाऱ्याजवळ येणार तेवढा वाऱ्याचा वेग वाढण्याचा अंदाज आहे. जमिनीला धडकल्यानंतर त्याचा वेग मंदावेल. पण तोपर्यंत हे वादळ प्रचंड नुकसान करु शकतं. हे वादळ गुजरातच्या किनाऱ्यावरुन पुढे पाकिस्तानला धडकण्याचा अंदाज आहे. या वादळामुळे हवामानात बदल झालाय. पुढच्या काही तासांमध्ये गुजरातच्या सौराष्ट्र, कच्छ भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई आणि कोकणातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. या संकटाला सध्याच्या घडीला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही. प्रशासनाकडून या संकटाच्या पार्श्वभूमीवर आधीच उपाययोजना केल्या जात आहेत. असं असताना आज देशावर दुसरं संकट आलं.
देशातील चार राज्यांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. या धरणीकंपामुळे सर्वसामान्य नागरीक भयभयीत झाले होते. पण सुदैवाने या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या भूकंपाची तीव्रता ही 5.4 रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती मिळत आहे. दुपारी 1 वाजून 33 मिनिटांनी हे धक्के जाणवले. भारतातील चार राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहे. यामध्ये दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर, चंदिगढसह अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तसेच पाकिस्तान आणि चीनमध्येही भूकंपाते तीव्र धक्के जाणवले आहेत.
नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील डोडा या ठिकाणी भूकंपाचं केंद्रबिंदू होतं. जमिनीपासून अवघ्या सहा किमीवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. त्याची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल इतकी होती.
विशेष म्हणजे मार्च महिन्यातही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. हे धक्के रात्रीच्यावेळेस जाणवले होते. या भूकंपाचे काही व्हिडीओ देखील समोर आले होते. धरणीकंप झाल्याचं लक्षात आल्यानंतर अनेक नागरीक भीतीने घराबाहेर पडले होते. तसेच एक इमारत ही भूकंपामुळे झुकली होती. तसेच दिल्ली-एनसीआरसह, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तराखंड संपूर्ण उत्तर भारतात हे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाचं केंद्र हे अफगाणिस्तानमधील हिंदूकुश क्षेत्र होतं.