महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार असल्याची बातमी सकाळी आली. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद ठेवली. त्यानुसारआज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. त्यात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा येथील विधानसभेची निवडणूक जाहीर केली गेली. महाराष्ट्र आणि झारखंडची जाहीर झाली नाही. महाराष्ट्राची निवडणूक का जाहीर केली नाही? हे निवडणूक आयोगाने सांगितले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर न करण्याचे कारण निवडणूक आयोगाने सांगितले. जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीमुळे सुरक्षा दल त्याठिकाणी असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक त्यानंतर जाहीर करण्यात येईल. तसेच महाराष्ट्रात पाऊस, गणपती उत्सव आणि पितृपक्षामुळे महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया जम्मू-काश्मीर आणि हरियाणानंतर करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. आता महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक जम्मू-काश्मीर आणि हरियाणीची प्रक्रिया झाल्यावर जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता होती. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. परंतु यंदा दोन्ही राज्यांत वेगवेगळ्या तारखांना मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. झारखंड विधानसभेत 81 सदस्य आहेत. या राज्यात 2019 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये 90 जागा आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे राज्य विभागले गेले आहे. याआधी 2014 मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये बराच काळापासून विधानसभा निवडणुका होऊ शकल्या नाहीत. मे 2022 च्या परिसीमनानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेच्या जागांची संख्या आता 90 झाली आहे. त्यात जम्मूमध्ये 43 विधानसभा जागा तर काश्मीरमधील 47 विधानसभा जागा आहेत. 2014 मध्ये, लडाखमधील 6 जागांसह जम्मूमधील 37 जागा आणि काश्मीर खोऱ्यातील 46 जागांसह 87 विधानसभा जागांवर निवडणुका झाल्या होत्या.
9 ऑगस्ट रोजी मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार यांनी अपल्या टीमसह जम्मू-कश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळेस त्यांनी लवकरच निवडणुका होणार असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयानेही जम्मू-कश्मीरमध्ये 30 सप्टेंबर 2024 पर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.