ED on Byjus | स्टार्टअपमधून यूनिकॉर्न बनलेली कंपनी बायजूसच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. एनफोर्समेंट डायरेक्टोरेटने बायजूसचे संस्थापक रवींद्रन यांच्याविरोधात लुकआउट नोटिस जारी केली आहे. याआधी रवींद्रन यांच्याविरोधात एलओसी “ओन इंटिमेशन” जारी करण्यात आलं होतं. यात इमीग्रेशन अधिकारी एखाद्या व्यक्ती बाहेर जात असेल, तर संबंधित यंत्रणेला कळवतात. पण त्याला देश सोडण्यापासून रोखत नाही. आता लुकआऊट सर्कुलर जारी केल्यानंतर रवींद्रन देशाबाहेर जाऊ शकत नाहीत.
बायजूसवर फेमा अंतर्गत आरोप झाले असून ईडी त्याची चौकशी करत आहे. कंपनीवर 2200 कोटी रुपये परदेशातून घेण्याचा आरोप आहे. त्याशिवाय कंपनीवर असाही आरोप आहे की, त्यांनी बेकायदरित्या 9 हजार कोटी रुपये देशाबाहेर पाठवले. कंपनीने 2021 साली परदेशी बाजारातून जवळपास 1.2 अब्ज डॉलरच कर्ज घेतलं होतं. त्यानंतर 8 महिन्यांनी कंपनीने सांगितलं की, त्यांच्या ऑडिटेड रिजल्टला विलंब होतोय. ऑगस्ट महिन्यात कॉर्पोरेट मंत्रालयाने आर्थिक माहिती द्यायला 17 महिने विलंब का लावला? म्हणून कारण विचारलं. तिथूनच कंपनीच्या अडचणी वाढण्यास सुरुवात झाली.
पगार देण्यासाठी संपत्ती गहाण ठेवली
एकवेळ अशी होती की, बायजूसची देशातील यशस्वी स्टार्टअप्समध्ये गणना व्हायची. आता कंपनी आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. बायजूसच्या परदेशी फंडिंगची चौकशी सुरु झाली आहे. कंपनीवर मनी लॉन्ड्रिंगच्या पैशांची हेरा-फेरी केल्याचा आरोप आहे. परिस्थिती अशी आहे की, कंपनीचे फाऊंडर बायजू रवींद्रन यांना आपली पेरेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी स्वत:ची आणि कुटुंबाची संपत्ती गहाण ठेवावी लागली आहे. जेणेकरुन 100 कोटी रुपयांच कर्ज मिळेल. त्यांनी आपले सर्व शेअर गहाण टाकले आहेत. आपल्या गुंतवणूकीच काय होणार? ही भीती कंपनीच्या गुंतवणूकदारांना सतावत आहे.