रोहित पवार, किशोरी पेडणेकर यांच्या पाठोपाठ आता ‘या’ उपमुख्यमंत्र्यांना ईडीचं समन्स

| Updated on: Jan 19, 2024 | 7:13 PM

ईडीकडून आता देशभरातील विविध नेत्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. ईडीने आज महाविकास आघाडीचे नेते रोहित पवार आणि किशोरी पेडणेकर यांना समन्स बजावल्याची बातमी समोर आली. त्यानंतर ईडीने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे.

रोहित पवार, किशोरी पेडणेकर यांच्या पाठोपाठ आता या उपमुख्यमंत्र्यांना ईडीचं समन्स
Follow us on

पाटणा | 19 जानेवारी 2024 : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या घरावर काल एसीबीने छापा टाकला. एसीबी अधिकाऱ्यांनी साळवी यांच्या घरी छापा टाकला. सलग आठ तास त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा त्यांना एसीबीने नोटीस पाठवली. साळवी यांच्याविरोधात कारवाई सुरु असतानाच महाविकास आघाडीच्या आणखी एका मोठ्या नेत्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना कथित कोविड बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं. महाविकास आघाडीच्या या दोन बड्या नेत्यांना चौकशीचं समन्स आल्याची बातमी ताजी असताना बिहारमधूनही मोठी बातमी आली. बिहारमध्येदेखील दोन मोठ्या नेत्यांना ईडीने चौकशीचं समन्स बजावलं आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे वडील तसेच आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. ईडीने लँड फॉर जॉब प्रकरणी समन्स बजावलं आहे. ईडी अधिकाऱ्यांनी स्वत: यादव यांच्या निवासस्थानी जावून समन्स दिलं आहे.

ईडीने 29 आणि 30 जानेवारीला लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. दोन्ही नेत्यांना ईडीच्या पाटणा येथील झोनल कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडीकडून दोन्ही नेत्यांच्या प्रत्यक्ष घरी समन्स बजावण्यात आल्याने या ईडी कारवाईला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.

यादव पिता-पुत्रांना ‘या’ प्रकरणी ईडीचं समन्स

लालू प्रसाद यादव 2004 ते 2009 च्या दरम्यान केंद्रीय रेल्वे मंत्री होते. ते केंद्रीय रेल्वे मंत्री असताना त्यांनी पदाचा दुरुपयोग करुन नोकरीच्या बदल्यात सातबारा अशी अट ठेवून अनेकांची नियुक्ती केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला होता. नियमांचं उल्लंघन करुन अनेकांना भारतीय रेल्वेत नियुक्ती करण्यात आलं, असं सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटलं होतं. नोकरीच्या बदल्यात खूप कमी किंमतीत उमेदरावारांनी आपली जमीन लालू प्रसार यादव यांच्या कुटुंबियांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता. पण या प्रकरणी कोर्टाने लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांच्या कन्या मीसा भारती आणि तेजस्वी यादव यांना जामीन मंजूर केला होता.