हैदराबाद, १५ मार्च २०२४ | दिल्ली दारू घोटाळ्यात आतापर्यंत सीबीआय आणि ईडीने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्यात अनेक मोठ्या नेत्यांची नावे समोर आली आहेत. आता अशी माहिती समोर येतेय की, या प्रकरणात ईडीने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना हैदराबादहून दिल्लीला आणले जात आहे. ईडीकडून के कविता यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्ली दारू धोरण प्रकरणाशी संबंधित या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने शुक्रवारी भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानाची झडती घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीकडून या प्रकरणात त्यांना अटक होऊ शकते. याआधी दोन वेळा त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. पण त्या चौकशीसाठी आल्या नव्हत्या. त्यानंतर आता ईडीने त्यांच्या घरावर धाड टाकत त्यांना ताब्यात घेतले आहे. चौकशीनंतर त्यांना अटक होऊ शकते.
के कविता या तेलंगणा विधान परिषदेच्या सदस्य आहेत. तसेच त्या पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. याप्रकरणी ईडीने यापूर्वीच त्यांची चौकशी केली आहे. मात्र, यावर्षी किमान दोनदा समन्स बजावूनही त्या चौकशीसाठी हजर झाल्या नाहीत.
लोकसभा निवडणुकीला अवघे काही आठवडे शिल्लक असताना ही कारवाई झाली आहे. तेलंगणात बीआरएसला २ वेळा सरकार स्थापन केले होते. पण तिसऱ्यांदा मतदारांनी काँग्रेसच्या हातात सत्ता दिली. आता काँग्रेस सरकारचे 100 दिवस पूर्ण झाले असताना कविता यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज हैदराबादच्या मलकाजगिरी येथे रोड शो होणार आहे.
हैद्राबाद येथील बीआरएस नेत्याच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. ईडीच्या विरोधात घोषणाबाजी ही करण्यात आली. आता ईडीच्या रडारवर आणखी काही नेते असल्याचं बोलले जात आहे.